समाजप्रबोधनाच्या अखंड ज्योतीला रेवदंड्याचे भव्य अभिवादन.. महाराष्ट्र भूषण आ.डॉ. श्री नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ रेवदंड्यात तीन भव्य स्वागत कमानी; सेवा, संस्कार आणि मानवतेच्या विचारांना मिळणार कायमस्वरूपी प्रवेशद्वार

छावा डिजिटल न्यूज | सचिन मयेकर | रेवदंडा 

रेवदंडा नगरीला लवकरच सेवा, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा नवा मानबिंदू लाभणार आहे. महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉ. श्री नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ थेरोंडा-फाटा, रेवदंडा मोठे बंदर आणि रेवदंडा बायपास येथे उभारण्यात येणाऱ्या तीन भव्य स्वागत कमानींचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कमानी केवळ प्रवेशद्वार नसून, समाजपरिवर्तनासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या एका युगपुरुषाच्या विचारांचे कायमस्वरूपी स्मारक ठरणार आहेत.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासनाची मंजुरी मिळाली. या कामासाठी आमदार महेंद्र दळवी यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे रेवदंड्यात सेवा आणि संस्कारांचा हा भव्य वारसा प्रत्यक्षात साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला.

भूमिपूजन सोहळ्यात आमदार महेंद्र दळवी, कामगार नेते दीपक रानवडे, जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी, डॉ. सचिन राऊळ, मुरुड पंचायत समिती सभापती निलेश घाटवळ, अलिबाग पंचायत समिती सभापती भाग्यता पाटील, पंचायत समिती सदस्य शरद गोंधळी, उपजिल्हाप्रमुख शैलेश चव्हाण, रेवदंडा सरपंच प्रफुल्ल मोरे, मांडला सरपंच ऋतिक नागोठकर, हर्षल घरत, मधुसूदन आठवले, शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, श्री सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉ. श्री नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांनी १९४३ मध्ये रेवदंड्यातून समाजप्रबोधनाची अखंड चळवळ उभी केली. त्यांनी लाखो कुटुंबांना सुसंस्कार, चारित्र्य, राष्ट्रप्रेम, सेवाभाव आणि अध्यात्माची दिशा दिली. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, शिक्षणाचा प्रसार, स्त्रीसन्मान, सामाजिक ऐक्य आणि नैतिक मूल्यांची जोपासना यासाठी त्यांनी आयुष्य वाहिले. त्यांच्या प्रेरणेने असंख्य कुटुंबांनी व्यसनमुक्त, सुसंस्कृत आणि समाजाभिमुख जीवनाचा मार्ग स्वीकारला.

आदरणीय डॉ. श्री.नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजविलेल्या या विचारांचा विशाल वटवृक्ष आज पद्मश्री व महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉ. श्री दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि  आदरणीय डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देश-विदेशात अधिक बहरला आहे. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, मेगा आरोग्य तपासणी शिबिरे, आरोग्य जनजागृती, स्वच्छता अभियान, गड-किल्ले स्वच्छता, वृक्षारोपण, जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धन, निर्माल्य संकलन, शैक्षणिक साहित्य वाटप, आपत्तीग्रस्तांना मदत, रोजगार मार्गदर्शन आणि अनेक समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. 

थेरोंडा फाटा, मोठे बंदर आणि रेवदंडा बायपास येथे उभारल्या जाणाऱ्या या भव्य स्वागत कमानी भविष्यात रेवदंड्याची नवी ओळख ठरणार आहेत. या कमानीतून प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला सेवा, संस्कार, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, रक्तदान, समाजप्रबोधन आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या महान परंपरेची प्रेरणा मिळणार आहे.

रेवदंड्याच्या इतिहासात या स्वागत कमानी केवळ वास्तू म्हणून नव्हे, तर महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अमर विचारांचे, समाजसेवेच्या अखंड परंपरेचे आणि मानवतेच्या संदेशाचे भव्य प्रवेशद्वार म्हणून कायम स्मरणात राहतील.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *