तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई-अलिबाग जलमार्ग पुन्हा गजबजला! मांडवा–गेटवे फेरीबोट सेवा सुरू; प्रवासी, पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा

पावसाळ्यातील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि अलिबागला जोडणारा महत्त्वाचा मांडवा–गेटवे ऑफ इंडिया सागरी जलमार्ग पुन्हा खुला झाला असून १ सप्टेंबरपासून फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली आहे.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | अलिबाग — दि. 0३ सप्टेंबर २०२६

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मध्यम आकाराच्या फेरीबोटींसाठी या मार्गाला परवानगी दिल्यानंतर जलमार्गावर पुन्हा प्रवाशांची वर्दळ सुरू झाली आहे. 

मुंबईकरांसाठी अलिबाग, मुरुड आणि रायगडच्या पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी हा जलमार्ग अत्यंत सोयीचा मानला जातो. रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वाढणारा वेळ टाळून मुंबईहून अलिबागकडे जलमार्गाने कमी वेळात पोहोचता येत असल्याने स्थानिक प्रवासी तसेच पर्यटकांकडून या सेवेला मोठी पसंती मिळते.

पावसाळ्यात समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन दरवर्षी या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक काही महिन्यांसाठी बंद ठेवली जाते. यंदाही पावसाळी विश्रांतीनंतर सेवा पुन्हा सुरू झाल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

या जलमार्गावर पीएनपी, मालदार, अजंठा आणि अपोलो यांसारख्या कंपन्यांच्या प्रवासी फेरीबोटी चालतात. खराब हवामानाचा अडथळा नसल्यास दिवसा जलवाहतूक सुरू राहणार असून, सेवा सुरू करण्यापूर्वी बोटींची आवश्यक डागडुजी तसेच सुरक्षा साधनांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

 पर्यटन व्यवसायाला नवसंजीवनी

मुंबई-अलिबाग जलमार्ग सुरू झाल्याचा थेट फायदा अलिबागसह मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला होण्याची अपेक्षा आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन वाहतूक, स्थानिक दुकानदार आणि अन्य व्यावसायिकांसाठी मुंबईकर पर्यटकांची वाढती संख्या महत्त्वाची ठरते.

गेटवे ऑफ इंडिया परिसरातून समुद्रमार्गे मांडव्याकडे होणारा प्रवास हा केवळ वाहतुकीचा पर्याय नसून पर्यटकांसाठी स्वतःमध्ये एक अनुभव आहे. त्यामुळे फेरीबोट सेवा पुन्हा सुरू झाल्याने आगामी पर्यटन हंगामात रायगडच्या किनारपट्टीवरील पर्यटनाला अधिक वेग मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.

मुंबई आणि रायगडला जोडणारी ही जलवाहतूक पुन्हा सुरू झाल्याने प्रवासी, पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.

 मुंबई-अलिबागचा समुद्री दुवा पुन्हा मजबूत झाला असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जलमार्गावर पुन्हा प्रवाशांची गजबज वाढणार आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *