५२.२ टन कचरा हटवून स्वच्छतेचा महामंत्र… १,२१० श्री सदस्यांचे व ग्रामस्थांचे श्रमदान; साळाव चेकपोस्ट ते अलिबाग दुतर्फा रस्ता व नागाव सहन बायपास पुलापर्यंत ५३ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | रेवदंडा 

दि. ३० ऑगस्ट २०२६

 स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजणारी जीवनपद्धती व्हावी, या उद्देशाने डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने आज, रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी रेवदंडा परिसरासह साळाव ते अलिबाग मार्गावर व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात तब्बल १,२१० श्री सदस्यांनी व ग्रामस्थांनी श्रमदान करत तब्बल ५२.२ टन कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला.

या स्वच्छता अभियानाची व्याप्तीही मोठी होती. साळाव चेकपोस्ट ते अलिबाग बायपास दुतर्फा रस्ता व नागाव सहान बायपास पुलापर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंसह रेवदंडा परिसरातील अंतर्गत रस्ते मिळून सुमारे ५३ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यासोबतच स्मशानभूमी आणि समुद्रकिनाऱ्याचा सुमारे ३ किलोमीटर परिसर स्वच्छ करण्यात आला.

या अभियानासाठी रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी आणि अलिबाग परिसरातील श्री सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात झाडू, फावडे आणि आवश्यक साहित्य घेत श्री सदस्यांनी व ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा साचलेला कचरा, पालापाचोळा, झाडाझुडपे आणि इतर घाण हटवत स्वच्छतेचे प्रभावी उदाहरण निर्माण केले.

अभियानादरम्यान गोळा करण्यात आलेला तब्बल ५२.२ टन कचरा एकत्रित करण्यात आला असून, त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. मोठ्या प्रमाणात झालेल्या या श्रमदानामुळे रस्ते, समुद्रकिनारा आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ व सुस्थितीत आणण्यात आला.

कचरा आणि अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होण्याबरोबरच विविध आजारांना पोषक वातावरण तयार होते. साचलेल्या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा स्वच्छता अभियानातून केवळ परिसर स्वच्छ होत नाही, तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही मोठे योगदान दिले जाते.

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजप्रबोधनातून स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व समाजासमोर मांडले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत पद्मश्री व महाराष्ट्र भूषण डॉ. श्री दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच महाराष्ट्र भूषण डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य जनजागृती, जलसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धनासह विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.

स्वच्छता अभियान वारंवार राबविण्यामागे केवळ आजचा परिसर स्वच्छ करणे हा उद्देश नसून, प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वच्छतेविषयीची संकल्पना ठामपणे उभी राहावी आणि सार्वजनिक ठिकाणे ही आपलीच जबाबदारी आहेत, ही भावना निर्माण व्हावी, हा व्यापक विचार आहे.

आजच्या अभियानातून १,२१० श्री सदस्यांनी श्रमदान करत ५२.२ टन कचरा हटविण्याचा केलेला विक्रमसदृश प्रयत्न स्वच्छतेच्या सामूहिक शक्तीची जाणीव करून देणारा ठरला. साळाव चेकपोस्टपासून अलिबाग बायपास पुलापर्यंत आणि रेवदंड्याच्या अंतर्गत परिसरापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत राबविण्यात आलेल्या या व्यापक अभियानामुळे संपूर्ण परिसराने स्वच्छतेचा संदेश पुन्हा एकदा अनुभवला.

यासोबतच साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये आणि डासांचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी डी.डी.टी. पावडर टाकण्यात आली. त्यामुळे स्वच्छतेसोबतच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही खबरदारी घेण्यात आली.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *