रेवदंड्यात गटारात पडलेल्या जखमी कबुतराला नागरिकांची तत्पर मदत
रेवदंडा येथील मारुती आळी परिसरातील गटारात एक मोठे कबुतर जखमी अवस्थेत आढळून आले. वरून खाली पडल्याने त्याच्या पंखांवरील बरीचशी पिसे निघून गेली होती. त्यामुळे त्याला उडता येत नव्हते. अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांपासून या मुक्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
छावा डिजिटल न्यूज मीडिया — सचिन मयेकर रेवदंडा दि. ३ सप्टेंबर २०२६
दरम्यान, मारुती आळी रस्त्यावरून जात असलेल्या परिसरातील रहिवासी सौ.सागरिका सूरज वरसोलकर यांच्या निदर्शनास हे जखमी कबुतर आले. त्यांनी तत्काळ तेथून जात असलेले सचिन मधुकर मयेकर यांच्या कानावर ही बाब घातली व कबुतर दाखवले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सचिन मयेकर यांनी विलंब न करता प्राणिमित्र राकेश काठे व पंचायत सदस्य दुशान्त झावरे यांच्याशी संपर्क साधला व याबाबत माहिती देऊन जखमी कबुतराला सुरक्षित ठिकाणी नेऊन आवश्यक मदत करण्याची विनंती केली.
यानंतर दुशान्त झावरे यांनी राकेश काठे यांच्याशी सल्लामसलत करून काळजीपूर्वक एका बॉक्समध्ये जखमी कबुतराला सुरक्षितपणे उचलून घेतले. जखमी कबुतराला तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवून त्याच्यावर आवश्यक प्राथमिक उपचार व देखभाल करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया संबंधित वन्यजीव विभागाच्या नियमांनुसार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
वेळीच नागरिकांच्या निदर्शनास आल्याने या मुक्या जीवाला संभाव्य धोका टळला. सौ. सागरिका वरसोलकर यांनी दाखविलेली संवेदनशीलता दुशान्त झावरे आणि सचिन मयेकर, राकेश काठे यांनी केलेली तत्पर मदत यामुळे जखमी कबुतराला वेळीच सुरक्षितता मिळाली.
मुक्या जीवांच्या संकटाच्या वेळी संवेदनशीलता दाखवून त्यांना मदतीचा हात देणे हीच खरी माणुसकी असून, रेवदंड्यातील या घटनेतून त्याचा प्रत्यय आला.
![]()

