शेवटून आठवा की सुरुवातीहून आठवा… कंस चक्रावला होता; पण देवाने जन्म घेतला आणि कंसाचा अंत झालाच! जन्माष्टमी विशेष | अधर्माच्या अंधारात जन्माला आलेल्या कृष्णाने दिला धर्माच्या विजयाचा संदेश
मथुरेच्या नगरीत कंसाचे राज्य होते. सत्ता हातात आली आणि त्या सत्तेचा अहंकार इतका वाढला की, कंसाला स्वतःच्या सामर्थ्यापुढे कोणाचीही भीती उरली नव्हती. प्रजेवर अन्याय, अत्याचार आणि दहशतीचे सावट होते. मात्र नियतीने कंसासाठी एक वेगळीच कथा लिहून ठेवली होती.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर — दि. 0४ सप्टेंबर २०२६
देवकीचा विवाह वसुदेवाशी झाला आणि विवाहानंतर देवकीला तिच्या माहेराहून सासरी घेऊन जात असताना आकाशवाणी झाली. देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल, अशी भविष्यवाणी झाली. ही भविष्यवाणी ऐकताच कंसाच्या पायाखालची जमीन सरकली. स्वतःच्या मृत्यूची भीती त्याच्या मनात घर करून बसली.
कंसाने देवकी आणि वसुदेव यांना कारागृहात टाकले. देवकीला होणाऱ्या प्रत्येक अपत्यावर त्याची नजर होती. एकामागून एक जन्मलेल्या बालकांचा कंसाने निर्दयीपणे वध केला. आठव्या अपत्याचा जन्म होण्याआधीच त्याला संपवून टाकण्याचा कंसाचा निर्धार होता.
कंसाने कितीही पहारा वाढवला, कितीही बंदोबस्त केला आणि नियतीला रोखण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी ज्याचा जन्म अधर्माचा अंत करण्यासाठी झाला होता, त्या कृष्णाला कोण रोखणार होते? आणि अखेर तो पवित्र क्षण आला. मथुरेच्या कारागृहात मध्यरात्री देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. बाहेर कंसाच्या अत्याचाराचा अंधार होता; मात्र त्याच क्षणी एका नव्या आशेचा जन्म झाला होता. वसुदेवांनी बालकृष्णाला टोपलीत ठेवले आणि कंसाच्या नजरेपासून वाचवत गोकुळाच्या दिशेने प्रस्थान केले. यमुना नदीला आलेला पूर, अंधारी रात्र, मुसळधार पाऊस आणि कंसाच्या सैनिकांचा पहारा अशा असंख्य अडचणी समोर होत्या. पण ज्याच्या रक्षणासाठी निसर्गही जणू स्वतः पुढे सरसावला होता, त्या बालकृष्णाला वसुदेव सुरक्षितपणे गोकुळात घेऊन गेले. गोकुळात कृष्णाचे बालपण सुरू झाले. यशोदेच्या अंगणात वाढलेला हा नटखट कान्हा पुढे अत्याचाराविरुद्ध उभा राहणारा आणि धर्माची स्थापना करणारा श्रीकृष्ण झाला. कंस मात्र आपल्या भीतीतून बाहेर पडला नव्हता. कृष्णाचा अंत करण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. पूतना, शकटासुर, तृणावर्त अशा अनेक संकटांना त्याने कृष्णाच्या दिशेने पाठवले. पण प्रत्येक वेळी कृष्णाने त्या संकटावर मात केली.
शेवटी कृष्ण मथुरेत पोहोचला. कंसासमोर उभा राहिला. ज्या कृष्णाला जन्म घेण्याआधीच संपवण्याचे स्वप्न कंसाने पाहिले होते, तोच कृष्ण त्याच्यासमोर उभा होता. आणि मग नियतीने आपला निर्णय सुनावला. कंसाचा अंत झाला. ज्याने सत्ता, सामर्थ्य आणि भीतीच्या जोरावर संपूर्ण मथुरेला आपल्या ताब्यात ठेवले होते, त्याचा शेवट एका बालकाच्या हातून झाला. कारण तो केवळ बालक नव्हता; तो धर्माच्या विजयाचे प्रतीक होता. म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमी ही केवळ कृष्णाच्या जन्माचा उत्सव नाही. हा दिवस आपल्याला सांगतो की, परिस्थिती कितीही कठीण असली, अन्याय कितीही मोठा असला आणि अधर्म कितीही शक्तिशाली दिसत असला, तरी त्याचा अंत निश्चित असतो. कंसाला वाटत होते की, सत्ता त्याच्या हातात आहे म्हणून नियतीही त्याच्या हातात आहे. पण नियती कोणाच्या सत्तेने बदलत नाही. सत्याचा मार्ग उशिरा का होईना, पण विजयाकडेच जातो. आजच्या काळातही श्रीकृष्ण जन्माची ही कथा तितकीच महत्त्वाची आहे. आपल्या आजूबाजूला अन्याय दिसला, चुकीच्या गोष्टींचा प्रभाव वाढला किंवा सत्याचा आवाज दबवला जात असल्याचे जाणवले, तरी निराश होण्याचे कारण नाही. कारण इतिहास एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो. अधर्माचा काळ कितीही मोठा असला तरी तो कायमचा राहत नाही. कंस कितीही शक्तिशाली असला तरी कृष्णाचा जन्म थांबवू शकत नाही. शेवटून आठवा की सुरुवातीहून आठवा, कंस चक्रावला होता; पण देवाने जन्म घेतला आणि कंसाचा अंत झालाच. हीच श्रीकृष्ण जन्माष्टमीची खरी शिकवण. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
जय श्रीकृष्ण.
![]()

