वर्षभर कर्तव्याच्या गणवेशात… अनंत चतुर्दशीनंतर रेवदंडा पोलिसांचा जल्लोष रेवदंडा पोलीस ठाण्यातील गणरायाला भावपूर्ण निरोप पोलिस बांधवांनी मनसोक्त नाचून व्यक्त केला आनंद

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र बंदोबस्तावर तैनात राहणाऱ्या रेवदंडा पोलीस ठाण्यातील गणरायाचा विसर्जन सोहळा २६ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि धूमधडाक्यात पार पडला.

छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर _रविवार , दि. २७ सप्टेंबर २०२६

गणेशोत्सव सुरू झाल्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत पोलीस बांधवांवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी असते. परिसरातील गणेशोत्सव त्यात विविध कार्यक्रम , मिरवणुका, गर्दी, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे नागरिकांच्या घरातील गणपती विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यातील गणरायाला निरोप देण्याची ही परंपरा अनेक ठिकाणी भावनिक क्षण ठरते.

मात्र पोलिसांचे काम केवळ बंदोबस्तापुरते मर्यादित नसते. वर्षभर कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांची नोंद घेणे, फिर्यादींच्या तक्रारी स्वीकारणे, FIR व NC प्रक्रिया, घटनास्थळी जाऊन तपास करणे, पंचनामे करणे, आरोपींचा शोध घेणे, तपासाची कागदपत्रे तयार करणे, न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक प्रक्रिया, वाहतूक व बंदोबस्ताची जबाबदारी तसेच विविध ऑनलाइन व संगणकीकृत नोंदींचे काम अशी अनेक जबाबदारी पोलीस बांधव पार पाडतात. महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार कायदा-सुव्यवस्था राखणे, गुन्हे रोखणे व उघडकीस आणणे आणि समाजाचे संरक्षण करणे ही पोलिसांची मूलभूत कर्तव्ये आहेत. 

दिवस असो वा रात्र… सण असो वा उत्सव…सामान्य नागरिक आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करत असताना पोलीस बांधव मात्र कर्तव्यावर तैनात असतात. कधी बंदोबस्त, कधी गुन्ह्याचा तपास, कधी अपघातस्थळी धाव, कधी तक्रारदाराचे म्हणणे ऐकणे, तर कधी रात्री-अपरात्री कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी रस्त्यावर उभे राहणे—हे पोलिसांचे खडतर आयुष्य वर्षभर सुरूच असते.

याच धावपळीच्या आणि जबाबदारीच्या आयुष्यात गणरायाचा विसर्जन सोहळा हा पोलिस बांधवांसाठी काही क्षण मनमोकळेपणाने आनंद व्यक्त करण्याचा दिवस ठरतो.

गाण्यांचा ठेका, गुलालाची उधळण आणि गणरायाच्या जयघोषात रेवदंडा पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांनी मनसोक्त नाचत आनंद व्यक्त केला. कर्तव्य बजावताना चेहऱ्यावर असलेले गांभीर्य बाजूला ठेवून यावेळी पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.वर्षभर जनतेच्या सेवेसाठी… आणि काही क्षण गणरायाच्या चरणी…अशा भावनेतून पार पडलेला हा विसर्जन सोहळा रेवदंडा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या एकोप्याची आणि उत्साहाची सुंदर झलक ठरला.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *