छावा विशेष | बलिप्रतिपदा आणि शिवप्रताप दिन एका बाजूला राजा बळीच्या दानशूरपणाचा गौरव, तर दुसरीकडे प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा फाडून स्वराज्याचा इतिहास घडवणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पराक्रम. १० नोव्हेंबरचा दिवस ठरला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि शौर्याचा अभिमान.
आजचा दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आणि ऐतिहासिक स्मृतीत विशेष महत्त्वाचा! एकीकडे बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याचा मंगलमय उत्साह, घराघरांत आनंदाचे वातावरण, नात्यांमधील प्रेम आणि समृद्धीची कामना; तर दुसरीकडे याच १० नोव्हेंबरच्या तारखेला इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा थरारक अध्याय.राजा बळीच्या दानशूरपणाची आठवण करून देणारा हा सण आणि स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या शिवरायांच्या शौर्याची आठवण करून देणारा हा ऐतिहासिक दिवस, असा दुहेरी अभिमान आज महाराष्ट्र अनुभवत आहे.
छावा डिजिटल न्यूज मीडिया ता.१० नोव्हेंबर २६ सचिन मयेकर
बलिप्रतिपदा हा दानशूर राजा बळीच्या स्मरणाचा दिवस. भगवान विष्णूंच्या वामन अवताराशी जोडलेली ही पौराणिक परंपरा दान, वचनपूर्ती आणि उदारतेचा संदेश देते. महाराष्ट्रात दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व असून पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा जपण्याची सुंदर परंपरा या दिवशी पाहायला मिळते. व्यापारी बांधवांसाठीही हा दिवस नव्या आर्थिक वर्षाच्या शुभारंभाचा आणि भरभराटीच्या संकल्पाचा मानला जातो. मात्र आजच्या या मंगलमय दिवसाला इतिहासाच्या पानांमध्ये आणखी एक विलक्षण महत्त्व लाभले आहे.
खानाचा कोथळा फाडला…. प्रतापगडाच्या मातीत स्वराज्याचा इतिहास घडला..
सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगा, जावळीचे घनदाट जंगल, खोल दऱ्या आणि दुर्गम वाटा… याच परिसरात १० नोव्हेंबर १६५९ रोजी असा एक ऐतिहासिक प्रसंग घडला, ज्याने दख्खनच्या राजकारणाला नवी दिशा दिली. स्वराज्याच्या अस्तित्वाला आव्हान देत प्रचंड सैन्य घेऊन विजापूरचा सरदार अफझलखान छत्रपती शिवाजी महाराजांना संपविण्याच्या उद्देशाने निघाला होता. वाटेत मंदिरे उद्ध्वस्त करणे, जनतेवर दहशत निर्माण करणे आणि महाराजांना उघड्या मैदानात युद्धासाठी भाग पाडणे, असे त्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र सह्याद्रीच्या कुशीत वाढलेल्या शिवरायांना जावळीच्या खोऱ्याचे भौगोलिक महत्त्व आणि शत्रूच्या डावपेचांची पूर्ण जाणीव होती.
अखेर प्रतापगडाच्या पायथ्याशी दोघांची भेट निश्चित झाली. भेटीसाठी शामियाना उभारण्यात आला. बाहेरून मैत्रीचा आणि तहाचा देखावा असला तरी या भेटीच्या पडद्यामागे मृत्यूचा सापळा लपलेला होता. महाराजांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अंगात चिलखत, डोक्यावर शिरस्त्राण, डाव्या हातात वाघनखं आणि उजव्या हातात बिचवा धारण केला होता.
भेटीच्या वेळी अफझलखानाने महाराजांना मिठी मारत आपल्या पोलादी पकडीत घेण्याचा आणि कट्यारीने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराजांच्या अंगावरील चिलखतामुळे त्याचा वार निष्फळ ठरला. क्षणाचाही विलंब न करता महाराजांनी वाघनख्यांचा प्रहार केला आणि बिचव्याने प्रतिहल्ला केला. या झटापटीत अफझलखान गंभीर जखमी झाला. प्रतापगडाच्या पायथ्याशी सुरू झालेल्या या संघर्षाने इतिहासाचा प्रवाहच बदलला.
याच प्रसंगात सय्यद बंडाने महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता जीव महाला यांनी त्याला रोखून महाराजांचे प्राण वाचवले. म्हणूनच इतिहासात अजरामर झालेली म्हण आजही अभिमानाने उच्चारली जाते, ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा!’
अफझलखानाच्या मृत्यूनंतर महाराजांनी ठरलेल्या योजनेनुसार प्रतापगडावरून तोफेचा इशारा दिला आणि जावळीच्या खोऱ्यात सज्ज असलेल्या मराठा सैन्याने विजापूरच्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला. या युद्धात मराठ्यांनी विजापूरच्या सैन्याचा पराभव केला. हा विजय केवळ रणांगणातील विजय नव्हता, तर स्वराज्याच्या सामर्थ्याची, शिवरायांच्या दूरदृष्टीची आणि अद्वितीय युद्धनीतीची ऐतिहासिक घोषणा होती.
आज प्रतापगडाकडे पाहताना त्या काळातील प्रत्येक क्षण डोळ्यांसमोर उभा राहतो. ज्या भूमीवर शिवरायांनी शत्रूच्या आव्हानाला सामोरे जात स्वराज्याचे रक्षण केले, त्या भूमीचा प्रत्येक कण आजही मराठी माणसाच्या मनात अभिमान जागवतो. प्रतापगडाचा बुरूज, जावळीचे जंगल, सह्याद्रीच्या कडा आणि महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा तो ऐतिहासिक परिसर आजही इतिहासप्रेमींना आकर्षित करतो.
एका बाजूला राजा बळीच्या दानशूरतेचा आदर्श, तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिष्ठेचा आणि शौर्याचा इतिहास! बलिप्रतिपदेचा संदेश आपल्याला उदारतेची शिकवण देतो, तर शिवप्रतापाचा इतिहास संकट कितीही मोठे असले तरी धैर्य, बुद्धिमत्ता आणि स्वाभिमानाच्या बळावर त्यावर मात करता येते, हे शिकवतो.
आजच्या या मंगलमय दिवशी प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. नव्या संकल्पांना यश मिळो आणि शिवरायांच्या इतिहासातून प्रत्येक पिढीला स्वराज्यनिष्ठेची प्रेरणा मिळत राहो, हीच सदिच्छा!
सणाचा आनंद साजरा करूया, इतिहासाचा अभिमान जपूया आणि शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया!
बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय भवानी… जय शिवाजी..
छावा डिजिटल न्यूज मीडिया
![]()

