गाडीवाला आया घर से कचरा निकाल…” पुन्हा घुमला घंटागाडीचा आवाज; रेवदंड्यात नव्या घंटागाडीचे दिमाखात उद्घाटन

 “गाडीवाला आया घर से कचरा निकाल…” हे गाणे पुन्हा एकदा रेवदंड्यातील ग्रामस्थांच्या कानावर पडताच अनेकांचे कान टवकारले. निमित्त होते रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवीन घंटागाडीचे..

छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर बुधवार , दि. ३० सप्टेंबर २०२६

रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीकडून कचरा संकलनाची व्यवस्था यापूर्वीपासूनच सुरू होती. मात्र, कचरा संकलनासाठी वापरण्यात येणारी जुनी घंटागाडी कालांतराने जीर्ण झाल्याने नागरिकांना अधिक चांगली सुविधा मिळावी, यासाठी सरपंच प्रफुल्ल मोरे, उपसरपंच संतोष मोरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी सुदेश राऊत यांनी नवीन घंटागाडी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले.

याच निर्णयातून रेवदंडा ग्रामपंचायतीला नवीन घंटागाडी उपलब्ध झाली असून, काल सरपंच प्रफुल्ल मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नव्या घंटागाडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सदस्य शरद गोंधळी, उपसरपंच संतोष मोरे, ग्रामपंचायत सदस्य आशा कमळनाखवा, खालील तांडेल, दुषांत झावरे, ग्रामपंचायत अधिकारी राहुल पोरे, सौं. भारती मोरे, किशोर मानकर, राजेश चुनेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नवीन घंटागाडीमुळे रेवदंडा परिसरातील कचरा संकलनाची व्यवस्था अधिक गतिमान आणि प्रभावी होण्यास मदत होणार असून, स्वच्छ रेवदंडा या संकल्पनेला आणखी बळ मिळणार आहे. नवीन घंटागाडीचा आवाज आता रेवदंड्यातील गल्लीबोळांत पुन्हा घुमणार असून, “कचरा बाहेर काढा…” असा संदेश देत स्वच्छतेच्या दिशेने ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू राहणार आहे.

“गाडीवाला आया घर से कचरा निकाल…” हा आवाज पुन्हा रेवदंड्याच्या गल्लीबोळांत घुमला आणि क्षणभर अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला तो आपला सचिन झावरे उर्फ ‘बाबू’ घंटागाडीचा आवाज म्हणजे बाबूची आठवण, बाबूचा हसरा चेहरा आणि प्रत्येकाशी असलेली त्याची आपुलकी. गाडीतून कचरा उचलताना एखादी महिला डबा घेऊन उभी दिसली की क्षणाचाही विलंब न करता गाडीतून खाली उतरून तिचा डबा स्वतः गाडीत टाकणारा बाबू… गाडी बंद पडली तरी घरी न बसता ग्रामपंचायत कार्यालयात येऊन मिळेल ते काम करणारा बाबू… आणि आपल्या हक्काच्या पगारातही प्रामाणिकपणे “माझे एवढे दिवस खाडे आहेत” असे स्वतःहून सांगणारा बाबू. आज घंटागाडी नवी आहे, गाडीवर पुन्हा तेच गाणे वाजत आहे; पण त्या आवाजामागचा ‘बाबू’ मात्र कायम आठवणीतच आहे… बाबू आपल्यात नाही, पण घंटागाडीचा प्रत्येक घंटानाद त्याची आठवण रेवदंड्याच्या मनात पुन्हा पुन्हा जागी करत राहणार आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *