रेवदंडा बाजारपेठेत दोन महिलांची हातसफाई मिठाईपासून दागिन्यांपर्यंत चोरीचा सपाटा शनिवार-रविवार सलग दोन दिवस दुकाने लक्ष्य CCTV मध्ये चोरीचे प्रकार कैद सतर्क दुकानदारांनी पाठलाग करून पकडले पोलिसांच्या ताब्यात
रेवदंडा बाजारपेठेत दोन महिलांनी हातचलाखीने चोरीचा अक्षरशः धुमाकूळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिठाई, फरसाण, चॉकलेट्सपासून इमिटेशन दागिन्यांपर्यंत विविध वस्तू दुकानांतून लंपास करणाऱ्या या महिलांना अखेर दुकानदारांनी रंगेहात पकडले. शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस वेगवेगळ्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले. चोरीचे प्रकार CCTV कॅमेऱ्यातही कैद झाले असून, या घटनेमुळे रेवदंडा बाजारपेठेतील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
छावा डिजिटल न्यूज मीडिया ता.१५ नोव्हेंबर २६ सचिन मयेकर
लकी स्वीट मार्टमध्ये मिठाईवर हात साफ शेजारच्या हॉटेलमध्येही चोरी..
रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे सात वाजण्याच्या सुमारास पारनाका येथील रेवदंडा ग्रामपंचायतीचे सदस्य सुराराम माळी यांच्या मालकीच्या लकी स्वीट मार्टमध्ये दोन महिला आल्या. दुकानातील परिस्थितीचा फायदा घेत त्यांनी हातचलाखीने मिठाईची पाकिटे आपल्या पर्समध्ये टाकली आणि तेथून निघाल्या. त्यानंतर या महिलांनी शेजारीच असलेल्या सुरेश माळी यांच्या लकी हॉटेलमध्ये प्रवेश केला. तेथेही फरसाण व इतर खाद्यपदार्थांची चोरी केली. मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर दुकानदारांच्या हा प्रकार लक्षात आला. सुराराम माळी आणि सुरेश माळी यांनी तातडीने माणसे पाठवून महिलांचा पाठलाग केला आणि त्यांना पकडून पुन्हा दुकानात आणले. यावेळी महिलांकडे पर्समध्ये काय ठेवले आहे, अशी विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला नकार दिला. मात्र, नंतर ‘सॉरी, सॉरी, चुकून झाले,’ असे म्हणत ५०० रुपयांची नोट देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, दुकानदारांनी कोणतीही तडजोड न करता पोलिसांना पाचारण केले.
शनिवारी लक्ष्मी नोव्हेल्टीमध्येही चोरी; मंगळसूत्र, बांगड्या आणि चॉकलेट्स लंपास..
विशेष म्हणजे, शनिवार, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी याच महिलांनी लक्ष्मी नोव्हेल्टी दुकानातही चोरी केली होती. तेथून मंगळसूत्र, बांगड्या यांसारखे इमिटेशन दागिने तसेच चॉकलेट्स चोरी करून नेले होते. या चोरीचे प्रकारही CCTV फुटेजमध्ये कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. मिठाईच्या दुकानापासून हॉटेलपर्यंत आणि नोव्हेल्टी दुकानापर्यंत सलग दोन दिवस सुरू असलेली ही हातसफाई अखेर दुकानदारांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली.
सुराराम माळी यांची तत्परता; रेवदंडा पोलिसांची तातडीने कारवाई..
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य सुराराम माळी यांनी तातडीने रेवदंडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. या महिला कोल्हापूर येथील असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास रेवदंडा पोलीस करीत आहेत.
चौल-भोवाळे येथील श्री दत्त मंदिरातील चांदीच्या चोरीची आठवण..
काही वर्षांपूर्वी चौल-भोवाळे येथील दत्त मंदिरात चांदीच्या वस्तूंची मोठी चोरी झाली होती. मंदिरातील चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याची ती घटना आजही परिसरातील नागरिकांच्या स्मरणात आहे. या चोरीचा तपास आणि चोरट्यांचा शोध याबाबत नागरिकांमध्ये आजही चर्चा होते. त्यामुळे धार्मिक स्थळे, दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुलं चोरणाऱ्या महिला आल्याची अफवाही पसरली होती.
काही काळापूर्वी रेवदंडा व परिसरात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या महिला आल्याची अफवाही काही प्रमाणात पसरली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही अपुष्ट माहितीवर विश्वास न ठेवता संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे.
थंडीचा मौसम सुरू; व्यापाऱ्यांनो, आता तरी सावध व्हा
थंडीचा हंगाम सुरू होताच बाजारपेठा, दुकाने आणि घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गर्दीचा फायदा घेऊन हातचलाखीने चोरी करणाऱ्यांपासून व्यापाऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. दुकानांतील CCTV कॅमेरे कार्यरत ठेवावेत, अनोळखी व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि संशयास्पद प्रकार घडल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. रेवदंडा पोलिसांनी बाजारपेठेत नियमित गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी व्यापारी वर्गातून अपेक्षा व्यक्त होत आहे. दुकानदारांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला; पण प्रत्येक वेळी दुकानदारांनीच पहारा द्यायचा का? बाजारपेठेतील सुरक्षिततेसाठी पोलिसांची गस्त आणि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाईही तितकीच आवश्यक आहे.
पोलिसी खाक्या व चोरीची कबुली कोल्हापूरच्या असल्याची माहिती
रेवदंडा पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान या दोन्ही महिलांनी आपण कोल्हापूर येथील असल्याचे सांगितले. तसेच दुकानांमधून मिठाई, फरसाण, चॉकलेट्स आणि इमिटेशन दागिने चोरी केल्याचेही पोलिसांसमोर कबूल केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी त्या महिलांनी आपल्या कृत्याबद्दल ‘सॉरी, चूक झाली’ असे म्हणत माफी मागितल्याचे समजते. या संपूर्ण प्रकारामुळे रेवदंडा बाजारपेठेत मोठी चर्चा सुरू आहे.
छावा डिजिटल न्यूज | जनतेचा आवाज, अन्यायावर प्रहार…
![]()

