अजब न्यायालयीन कारभार? तारीख पे तारीख… मग न्याय कधी? एका साक्षीदाराच्या अनुभवातून संपूर्ण न्यायव्यवस्थेसमोर उभा राहिलेला गंभीर प्रश्न…
न्यायालय म्हणजे सामान्य माणसासाठी शेवटची आशा. अन्याय झाला, गुन्हा घडला किंवा एखाद्याचा जीव गेला, तर न्याय मिळण्यासाठी पीडित कुटुंब न्यायालयाच्या दारात येते. मात्र हा न्याय मिळण्यासाठी जर वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली, तर त्या व्यवस्थेकडे प्रश्न विचारण्याची वेळ निश्चितच आली आहे.
काल एका खटल्यात साक्षीदार म्हणून न्यायालयात उपस्थित राहण्याचा प्रसंग आला. त्या निमित्ताने न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग जवळून अनुभवता आला. एका गंभीर गुन्ह्याला चार वर्षे उलटून गेल्यानंतरही प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत सुरू आहे. साक्षीदार येतात, प्रक्रिया होते, पुढील तारीख मिळते… आणि पुन्हा प्रतीक्षा सुरू होते.
ही केवळ एका खटल्याची गोष्ट नाही. देशभरातील न्यायालयांमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. काही प्रकरणांमध्ये पीडित व्यक्ती या जगात नसते, साक्षीदार वृद्ध होतात, कुटुंबाची आर्थिक आणि मानसिक अवस्था बदलते; पण न्यायालयीन प्रक्रिया मात्र सुरूच राहते. न्यायालयीन प्रक्रिया पुराव्यांवर आणि कायद्याच्या चौकटीतच चालली पाहिजे. आरोपीला न्याय मिळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पीडिताला वेळेत न्याय मिळणेही महत्त्वाचे आहे. मग प्रश्न असा आहे चार वर्षे… पाच वर्षे… दहा वर्षे… न्यायासाठी एवढी प्रतीक्षा का? तारीख पे तारीख ही व्यवस्था सामान्य माणसाच्या मनात न्यायव्यवस्थेबद्दल निराशा निर्माण करू नये. न्यायव्यवस्थेचा वेग वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर, साक्षी नोंदविण्याची जलद प्रक्रिया, अनावश्यक तहकूब टाळणे आणि प्रलंबित खटल्यांचा वेगाने निपटारा यासारख्या सुधारणा करण्याची गरज आहे. कारण न्याय उशिरा मिळाला, तर कायदेशीरदृष्ट्या तो न्याय असला तरी पीडित कुटुंबाच्या आयुष्यात त्याची किंमत कमी होण्याचा धोका असतो. कालचा माझा साक्षीदार म्हणून आलेला अनुभव एका खटल्यापुरता मर्यादित नाही. त्यातून एक मोठा प्रश्न समोर येतो न्यायव्यवस्था अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होण्यासाठी आता ठोस सुधारणा होण्याची गरज नाही का? हा प्रश्न न्यायालयावर टीका करण्यासाठी नाही, तर सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी मजबूत व्हावा, यासाठी आहे. गुन्हा घडल्यानंतर न्याय मिळायलाच हवा…पण तो न्याय वेळेत मिळायलाही हवा
सचिन मयेकर
छावा डिजिटल न्यूज मीडिया, रायगड
![]()

