संपादकीय | ५१०० रुपये पाठवले… पण चार खांदे द्यायलाही वेळ नव्हता! वृद्धाश्रमात बापाचा अंत… लेकींनी VIDEO कॉलवर पाहिले अंत्यसंस्कार; समाजाला अंतर्मुख करणारी हृदयद्रावक घटना

सचिन मयेकर | ६ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया

बाबा, मी येते…” या एका वाक्याची वाट पाहत एका वृद्ध पित्याने अखेरचा श्वास घेतला. पण तो क्षण कधीच आला नाही. आयुष्यभर आपल्या तिन्ही लेकींना शिक्षण, संस्कार आणि सक्षम भविष्य देणाऱ्या शिवचरण रतन गुप्ता यांचा शेवट वृद्धाश्रमात झाला. त्यांच्या डोळ्यांसमोर ना लेकी होत्या, ना नातवंडं, ना घर… फक्त एकाकीपणा! एकेकाळी सोनीपतमधील नावाजलेले कापड व्यापारी म्हणून शिवचरण रतन गुप्ता यांची ओळख होती. कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय उभा केला. तिन्ही लेकींना उत्तम शिक्षण देत स्वावलंबी बनवलं, त्यांच्या प्रत्येक स्वप्नासाठी आयुष्य वेचलं. पण नियतीचा किती क्रूर खेळ! ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी घाम गाळला, त्याच पित्याच्या वाट्याला शेवटी वृद्धाश्रमातील एकाकी खोली, मुलींची प्रतीक्षा आणि अखेरचा निरोपही मोबाईलच्या स्क्रीनवरून पाहण्याचं दुःख आलं. चितेच्या ज्वाळांपेक्षा त्यांच्या आयुष्याची ही शोकांतिका अधिक विदारक ठरली.

अंत्यविधीसाठी मुली आल्या नाहीत. मोठ्या मुलीने ५१०० रुपये ऑनलाइन पाठवले आणि एवढंच सांगितलं, “अंत्यसंस्कार नीट करून घ्या.” वडिलांचं शेवटचं दर्शन? तेही व्हिडिओ कॉलवर! अस्थी घेण्यासाठीही कुणी आलं नाही. अखेर वृद्धाश्रमानेच त्यांच्या अस्थी गंगेत विसर्जित केल्या.

व्हिडिओ कॉल सुरू होता… चिता सज्ज होती… आणि त्या बाजूने एक आवाज आला, “अजून किती वेळ लागेल अंत्यविधीला?” त्या एका प्रश्नाने तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. ज्या बापाने आयुष्यभर लेकरांसाठी वेळ दिला, त्याच बापाच्या शेवटच्या प्रवासासाठी मुलींना काही क्षणही देता आले नाहीत. त्या एका वाक्याने केवळ एका पित्याचं हृदय नाही, तर माणुसकीच जणू चितेवर जळताना दिसली.

हा प्रसंग फक्त एका कुटुंबाचा नाही; तो आपल्या समाजाच्या बदलत्या चेहऱ्यावरचा काळा डाग आहे.

एकेकाळी आई-वडील मुलांसाठी स्वतःच्या इच्छा मारून जगायचे. स्वतः फाटके कपडे घालतील, पण मुलांच्या शिक्षणात कमी पडू देणार नाहीत. स्वतः उपाशी राहतील, पण मुलांच्या ताटात अन्न कमी पडू देणार नाहीत. त्याच मुलांच्या यशासाठी आयुष्य झिजवणाऱ्या पालकांच्या वाट्याला शेवटी वृद्धाश्रम आणि एकाकी मृत्यू का यावा?

पैसा माणसाला श्रीमंत करू शकतो; पण तो मायेचा स्पर्श, डोक्यावरून फिरणारा हात आणि शेवटच्या क्षणी जवळ बसणारी लेकरं विकत घेऊ शकत नाही. ५१०० रुपयांनी अंत्यविधी होऊ शकतो; पण पित्याचं ऋण फेडता येत नाही.

आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे—उद्या आपल्या आई-वडिलांच्या शेवटच्या क्षणी आपण त्यांच्या जवळ असू का? की व्यस्त वेळापत्रक, नोकरी आणि अंतराची कारणं देत मोबाईलच्या स्क्रीनवरून त्यांचा निरोप घेऊ?

वृद्धाश्रम वाढत आहेत, पण घरातील माया कमी होत आहे. आधुनिकतेच्या धावपळीत नाती मागे पडत आहेत. करिअर, पैसा आणि प्रतिष्ठा यांच्या शर्यतीत आपण जन्मदात्यांनाच हरवत आहोत.

आज शिवचरण गुप्ता गेले… उद्या अशी वेळ कोणावरही येऊ शकते. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. आई-वडिलांना वेळ द्या. त्यांच्याशी बोला. त्यांचा हात हातात घ्या. कारण त्यांच्या जाण्यानंतर पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. अंत्यविधीसाठी पाठवलेले ५१०० रुपये मोठे होते का, की वडिलांना शेवटचा चार खांदे देण्यासाठी लागणारी काही तासांची उपस्थिती? हा प्रश्न फक्त त्या तिन्ही लेकींसाठी नाही… तर प्रत्येक त्या मुला-मुलीसाठी आहे, ज्यांच्या आई-वडिलांना आज फक्त पैशांची नाही, तर आपल्या माणसांच्या सहवासाची गरज आहे. 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *