एका चित्रपटाच्या निमित्ताने जाग्या झाल्या आठवणी… काळाच्या पडद्याआड गेलेल्या प्रमोद व पल्लवी वहिनीला भावपूर्ण सलाम

BVM चित्रपट पाहण्यासाठी गेलो आणि अचानक मनात एक ओळखीचा, हसरा चेहरा तरळून आला… रेवदंडा येथील आमचे मित्र, कॅमेरामन आणि फोटोग्राफर प्रमोद कांबळी.

छावा डिजिटल न्यूज मीडिया सचिन मयेकर – रेवदंडा ता.. ०७/०९/२६

प्रमोद कांबळी म्हणजे नेहमी चेहऱ्यावर असणारे स्मित हास्य, आपुलकीने विचारपूस करणारा स्वभाव आणि सुख-दुःखात मनापासून सहभागी होणारा माणूस. कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनेकांच्या आठवणी आपल्या कॅमेऱ्यात जपणारा हा माणूस आज मात्र स्वतःच आठवणींच्या रूपाने आपल्या मनात उरला आहे.

त्यांच्या पत्नी पल्लवी प्रमोद कांबळी (पल्लवी वहिनी) यांचाही स्वभाव तितकाच प्रेमळ आणि आपुलकीचा. भेट झाली की आवर्जून विचारपूस करणाऱ्या, प्रेमाने बोलणाऱ्या आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखाची काळजी घेणाऱ्या पल्लवी वाहिनी आज आपल्यात नाहीत.

कोरोनाच्या कठीण काळात सर्वप्रथम पल्लवी वहिनी आपल्याला सोडून गेल्या…

आणि त्यांच्या जाण्याने प्रमोदच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कदाचित कधीच भरून निघाली नाही. काही वर्षांनी प्रमोद  त्यांच्या आठवणींच्या वाटेने काळाच्या पडद्याआड निघून गेला.

आज अचानक चित्रपटगृहात बसलेलो असताना त्यांच्या आठवणी मनात दाटून आल्या. काही माणसं आपल्या आयुष्यात फार मोठा गाजावाजा न करता येतात… पण त्यांच्या जाण्यानंतर जाणवतं की, आपल्या आयुष्यात त्यांच्या अस्तित्वाला किती मोठी जागा होती.

कॅमेऱ्यामागे उभा राहून इतरांचे क्षण कायमचे जपणारा प्रमोद आणि प्रत्येकाशी आपुलकीने नातं जोडणाऱ्या पल्लवी वहिनी… आज दोघेही प्रत्यक्षात आपल्यासोबत नसले तरी त्यांच्या आठवणी, त्यांचे हसरे चेहरे आणि त्यांनी दिलेली माणुसकीची ऊब कायम मनात जिवंत राहील.

काळ कितीही पुढे गेला, माणसं कितीही दूर गेली, तरी काही नाती आणि काही आठवणी मनातून कधीच पुसल्या जात नाहीत…

प्रमोद आणि पल्लवी वहिनी, तुमच्या पवित्र स्मृतींना मनःपूर्वक अभिवादन.

 सलाम छावा परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *