छावा स्पेशल | कर्तव्यावर काळाचा घाला अमली पदार्थ तस्कराचा पाठलाग करताना पोलीस हवालदाराचा मृत्यू जावेद बागसिराज यांच्या निधनाने पोलीस दलावर शोककळा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी धावले पण नियतीने घेतला घात दोन लेकरांचे पितृछत्र हरपले कर्तव्यदक्ष पोलिसाच्या जाण्याने हळहळ

अमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस दलावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमली पदार्थ तस्कराचा पाठलाग करताना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदार जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कर्तव्य बजावताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पोलीस दलासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी ✍️ छावा डिजिटल न्यूज मीडिया – सचिन मयेकर

 अमली पदार्थ विक्रीची खबर पोलिसांचा सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील संत तुकारामनगर परिसरातील आंतरिक सोसायटीजवळ एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाच्या विक्रीसाठी काही संशयित येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरात सापळा रचला. कारवाईदरम्यान एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले; मात्र दुसऱ्या संशयिताने तेथून पळ काढला.

 स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाठलाग

पळून जाणाऱ्या संशयिताला पकडण्यासाठी पोलीस हवालदार जावेद बागसिराज यांनी पाठलाग सुरू केला. मात्र, धावत असतानाच त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते जमिनीवर कोसळले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 २०१० पासून पोलीस दलात सेवा.

जावेद बागसिराज यांनी २०१० मध्ये पुणे शहर पोलीस दलात सेवा सुरू केली होती. हडपसर आणि मुंढवा पोलीस ठाण्यांमध्ये काम केल्यानंतर २०१८ मध्ये स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ते रुजू झाले. त्यानंतर त्यांनी पिंपरी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकात सेवा बजावली. कर्तव्य बजावताना आलेल्या या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन लहान मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याची बाब विशेष वेदनादायी आहे. एका बाजूला अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांची लढाई सुरू असताना, त्याच मोहिमेदरम्यान एका कर्तव्यदक्ष पोलिसाचा अंत होणे ही मन सुन्न करणारी घटना आहे.

अमली पदार्थांविरोधातील लढा केवळ पोलिसांचा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलिसांना अनेकदा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. जावेद बागसिराज यांच्या निधनाने एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे, तर पोलीस दलाने आपला एक सहकारी गमावला आहे. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या साखळ्यांचा केवळ किरकोळ कारवाईपुरता पाठपुरावा न करता, त्यामागील संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर धोकादायक मोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांनाही प्राधान्य मिळाले पाहिजे. कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या जावेद बागसिराज यांना ‘छावा’ परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली!

भावपूर्ण श्रद्धांजली.

— छावा डिजिटल न्यूज मीडिया

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *