माड कोसळला, दोन फुटांवर थांबला जीवघेणा धोका घरात दोन मुले, सुना आणि लहान बाळ; धोकादायक माडांबाबत एसपींकडे लेखी तक्रार
आगरकोट परिसरात घराच्या दिशेने झुकलेल्या नारळाच्या माडांपैकी एक माड अचानक कोसळून घरापासून अवघ्या दोन फुटांवर पडल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, त्यावेळी घरात दोन मुले, सुना आणि लहान बाळ उपस्थित असल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.
छावा डिजिटल न्यूज मीडिया | बुधवार , दि. २३ सप्टेंबर २०२६
या घटनेनंतर आगरकोट येथील श्रीमती अपर्णा शंकर पाटील यांनी दि. २२ सप्टेंबर रोजी रायगडच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज साद केला आहे.
श्रीमती पाटील यांच्या अर्जानुसार, त्यांच्या घरासमोरच्या बागायतीमध्ये अनेक नारळाचे माड असून त्यापैकी काही माड सार्वजनिक रस्त्याच्या तसेच त्यांच्या घराच्या दिशेने झुकलेले आहेत. या धोकादायक माडांबाबत प्रशासनाला वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार करून माहिती देण्यात आली होती, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सुमारे महिनाभरापूर्वी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एक नारळाचा माड अचानक कोसळला. हा माड घरापासून अवघ्या दोन फुटांवर पडल्याने मोठा धोका निर्माण झाला. सुदैवाने कुटुंबातील कोणालाही दुखापत झाली नाही.
अर्जानुसार, परिसरातील इतर नारळाचे माड अद्यापही धोकादायक स्थितीत असून ते घर व सार्वजनिक रस्त्याच्या दिशेने झुकलेले आहेत. त्याच परिसरातून विद्युत वाहिन्याही गेलेल्या असल्याने, माड विद्युत तारांवर कोसळल्यास शॉक लागणे किंवा गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, धोकादायक माडांबाबत संबंधितांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता ऐकून घेतले जात नसल्याचा आरोपही अर्जात करण्यात आला आहे.
“माड एकदा कोसळूनही पंचनामा होत नसेल, तर जीवितहानी होण्याची वाट पाहावी लागणार का?”
“आमचा मृत्यू झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का?” असा संतप्त सवाल श्रीमती अपर्णा शंकर पाटील यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, धोकादायक माडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी आणि भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये, अशी मागणी श्रीमती पाटील यांनी केली आहे.
![]()

