रायगड जिल्हा परिषदेत लाचखोरीचा महाभूकंप! पत्नीच्या बदलीसाठी दीड लाखांची लाच अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला ACBचा दणका! रंगेहात पकडल्याने जिल्हा परिषदेत खळबळ; ‘बदलीच्या बाजाराचा’ पर्दाफाश?

रायगड जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत सहायक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आणि जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जाणारे योगेश प्रकाश भस्मे (वय ४६) यांना तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहें.

छावा डिजिटल न्यूज मीडिया | गुरुवार , दि. २४ सप्टेंबर २०२६

तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने पैसे देण्याऐवजी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारत असताना भस्मे यांना पथकाने पकडले आहे.

या कारवाईमुळे रायगड जिल्हा परिषदेतील बदलीच्या व्यवहारांपासून प्रशासकीय कामकाजापर्यंत अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. विशेष म्हणजे अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाशी संबंधित व्यक्तीवरच लाचखोरीची कारवाई झाल्याने जिल्हा परिषद प्रशासन आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील लाचेची रक्कम नेमकी कोणासाठी मागण्यात आली होती, या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि बदल्यांच्या प्रक्रियेत काही गैरप्रकार झाले आहेत का, याचा तपास आता एसीबीकडून केला जाणार आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर जिल्हा परिषद परिसरासह कुंटे बागेत व संपूर्ण अलिबाग तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली. मात्र, या प्रकरणात इतर कोणाचाही सहभाग असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. एसीबीच्या पुढील तपासातून या संपूर्ण प्रकरणामागील नेमके वास्तव समोर येणार आहे.

दीड लाखांच्या लाचेच्या कारवाईने जिल्हा परिषद हादरली असून, आता या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, याकडे संपूर्ण रायगडचे लक्ष लागले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *