सायबर फसवणुकीसाठी ‘म्युल’ बँक खाते पुरवल्याचा आरोप रेवदंड्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सचिन मयेकर | ६ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया

सायबर गुन्हेगारांना कमिशनच्या मोबदल्यात स्वतःचे बँक खाते वापरण्यास देणे एका महिलेस चांगलेच महागात पडले आहे. सायबर फसवणुकीत वापरासाठी ‘म्युल’ बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी एका महिलेसह अन्य एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या कारवाईमुळे सायबर गुन्ह्यांविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

रेवदंडा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई जीवनकुमार शिवाजी मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ फेब्रुवारी २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत  हा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणात एक ३५ वर्षीय महिला तसेच संदीप (पूर्ण नाव व पत्ता अद्याप निष्पन्न नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम संबंधित बँक खात्यात जमा करून ती नंतर विविध माध्यमांतून काढण्यात किंवा इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे उघड झाले आहे. संबंधित खाते हे ‘म्युल अकाऊंट’ म्हणून वापरले गेल्याचे तपासातून स्पष्ट झाले असून, आरोपींनी कमिशनच्या मोबदल्यात स्वतःचे खाते इतरांना वापरण्यास दिल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०९/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१७(५), ६१(२), ४९ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व तपास अधिकारी करीत आहेत.

 ‘म्युल अकाऊंट’ म्हणजे काय?

सायबर गुन्हेगार फसवणुकीतून मिळालेली रक्कम लपवण्यासाठी किंवा फिरवण्यासाठी इतर व्यक्तींची बँक खाती वापरतात. अशा खात्यांना ‘म्युल अकाऊंट’ म्हटले जाते. अशा प्रकारे स्वतःचे खाते वापरण्यास देणे हे देखील गंभीर गुन्हा असून संबंधित खातेदारालाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *