गेल इंडिया कंपनीत दोन लाखांच्या कॉपर केबल चोरीचा प्रयत्न; तिघे तरुण सुरक्षारक्षकांच्या ताब्यात उसर येथील विद्युत सबस्टेशन परिसरातील घटना; रेवदंडा पोलिसांत गुन्हा दाखल
छावा डिजिटल न्यूज मीडिया ता.०१ नोव्हेंबर २६ सचिन मयेकर
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसर येथील गेल इंडिया कंपनीच्या विद्युत सबस्टेशन परिसरात सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या कॉपर केबलची चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी आजूबाजूच्या परिसरातील आंदोशी, पो. मल्याण, ता. अलिबाग येथील तीन तरुणांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास उसर येथील गेल इंडिया कंपनीच्या इलेक्ट्रिकल सबस्टेशन क्रमांक १ परिसरात ही घटना घडली. आरोपींनी कुणे गावाच्या बाजूला कंपनीच्या वॉल कंपाउंडला असलेल्या भगदाडातून कंपनीच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर सबस्टेशन परिसरात ठेवलेला सुमारे दोन लाख रुपये किमतीचा १०० मीटर कॉपर केबलचा रोल चोरण्याचा प्रयत्न सुरू केला.
मात्र, कंपनीच्या सुरक्षारक्षकांना हा प्रकार प्रत्यक्ष निदर्शनास आल्याने चोरीचा प्रयत्न उघडकीस आला. सुरक्षारक्षकांनी वेळीच लक्ष दिल्यामुळे मोठे नुकसान टळले.
या प्रकरणी कंपनीचे फिर्यादी अंकुर भाटिया (वय ३६, रा. गेल इंडिया कंपनी, उसर) यांच्या तक्रारीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३२९(३), ६२ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मनीष ठाकूर करीत आहेत.
कंपनीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
औद्योगिक कंपन्यांच्या परिसरातील मौल्यवान विद्युत साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. कंपनीच्या संरक्षक भिंतीला असलेले भगदाड आणि त्यातून झालेला प्रवेश पाहता सुरक्षा व्यवस्थेची अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.
![]()

