नागावमध्ये पुन्हा खळबळ! समीरा कॉम्प्लेक्स ते हिरानंदानी परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याची चर्चा जेसीबी आणण्यासाठी गेलेल्या कामगारांना दिसल्याचा दावा; वनविभागाच्या अधिकृत पुष्टीकडे लक्ष

नागाव | छावा डिजिटल न्यूज मीडिया – सचिन मयेकर

नागाव परिसरातील बिबट्याच्या वावराबाबतची गेल्या वर्षापासून सुरू असलेली चर्चा आता कुठे शांत होत असतानाच,आज बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी रात्री पुन्हा एकदा बिबट्यासदृश्य वन्यप्राणी दिसल्याची माहिती समोर आली आहे. नागाव येथील समीरा कॉम्प्लेक्स तसेच हिरानंदानी परिसरात हा प्राणी दिसल्याची चर्चा असून, जेसीबी आणण्यासाठी गेलेल्या काही कामगारांना हिरानंदानी परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याचा दावा करण्यात येत आहे. या वृत्तामुळे परिसरात पुन्हा खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वीही नागाव आणि आसपासच्या परिसरात वन्यप्राण्याच्या वावराबाबत चर्चा झाली होती. पालव हिरानंदानी परिसरात सुपारी काढण्यासाठी गेलेल्या एका कामगाराला बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागाशी संपर्क साधला होता. पाहणीदरम्यान काही पाऊलखुणा आढळल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्या खुणा नेमक्या कोणत्या वन्यप्राण्याच्या आहेत, याबाबत निश्चित निष्कर्ष समोर आलेला नसल्याने या प्रकरणातील संभ्रम कायम आहे.

त्यातच आता समीरा कॉम्प्लेक्स आणि हिरानंदानी परिसरात पुन्हा बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याची चर्चा सुरू झाल्याने नागावसह आसपासच्या भागातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. जेसीबी आणण्यासाठी गेलेल्या कामगारांना नेमका कोणता प्राणी दिसला, तो बिबट्या होता की अन्य वन्यप्राणी, याची अधिकृत खातरजमा होणे आवश्यक आहे. त्यामुळे वनविभागाने संबंधित परिसराची पाहणी करून परिस्थिती स्पष्ट करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अफवांपासून सावध राहा; सतर्कता बाळगा.

नागरिकांनी केवळ चर्चेच्या आधारे निष्कर्ष काढू नयेत किंवा अपुष्ट माहिती प्रसारित करू नये. वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, त्याचा पाठलाग करणे किंवा गर्दी करणे टाळावे. शक्य असल्यास सुरक्षित अंतरावर राहून तातडीने वनविभागाला माहिती द्यावी.

नागावमध्ये पुन्हा दिसल्याची चर्चा असलेला हा प्राणी नेमका कोणता? कामगारांना खरोखर बिबट्या दिसला की अन्य वन्यप्राणी? या प्रश्नांची उत्तरे वनविभागाच्या प्रत्यक्ष पाहणी आणि अधिकृत माहितीनंतरच स्पष्ट होतील. तोपर्यंत नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहणे आवश्यक आहे.

छावा मत : नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मात्र, वन्यप्राण्याची अधिकृत ओळख पटण्यापूर्वी त्याला बिबट्या ठरवून भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये. वनविभागाने तातडीने पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, हीच अपेक्षा.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *