मनसेच्या लढ्याला मोठे यश अखेर खारेपाटकरांना दिलासा अलिबाग–मांडवा मार्गे शिरवली एसटी पुन्हा धावली
सचिन मयेकर | ४ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया
खारेपाट विभागातील हजारो प्रवाशांच्या न्याय्य मागणीला अखेर यश आले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अलिबाग–मांडवा मार्गे शिरवली एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बससेवा बंद असल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत होते. अखेर एसटी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी अलिबाग आगार गाठत आगार नियंत्रकांची भेट घेत खारेपाट विभागासाठी पर्यायी बससेवा तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी केली होती. रस्त्याच्या कामामुळे बससेवा बंद ठेवणे योग्य नसून, पर्यायी व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले होते.
मनसेच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत आजपासून सकाळी ७.०० वाजता आणि संध्याकाळी ६.०० वाजता अलिबाग–मांडवा मार्गे शिरवली बससेवा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खारेपाट विभागातील हजारो नागरिकांचा दैनंदिन प्रवास पुन्हा सुरळीत होणार असून, खासगी वाहनांवरील वाढता आर्थिक भारही कमी होणार आहे.
या निर्णयाबद्दल मनसेच्या वतीने अलिबाग आगार व्यवस्थापन आणि आगार मंडळाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. जनतेच्या प्रश्नांसाठी मनसे सातत्याने रस्त्यावर उतरून लढत राहील, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
खारेपाट विभागातील नागरिकांनीही बससेवा पुन्हा सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, “जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्यांनाच यश मिळते,” अशी प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.
दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर खारेपाटकरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश मिळताच शिरवली एसटी पुन्हा रुळावर धावली आणि हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
![]()

