स्पा सेंटरच्या आड देहव्यापाराचा धंदा पोलिसांची धाड महिला संचालिकेसह व्यवस्थापक गजाआड

छावा डिजिटल न्यूज पोर्टल |मुंबई – PTI – दि. 3१ मे २०२६

नवी मुंबईतील वाशी परिसरात स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या रॅकेटचा मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत स्पा सेंटरच्या महिला संचालिकेसह एका व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली अनैतिक कृत्ये सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची सत्यता पडताळण्यासाठी मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने प्रथम बनावट ग्राहक पाठवून गुप्त तपास केला. तपासादरम्यान संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत स्पा सेंटरवर धाड टाकली. कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली. यावेळी पोलिसांनी स्पा सेंटरच्या संचालिका सविता संतोष जैसवाल (४०) आणि व्यवस्थापक विनायक लहू कावले (३०) यांना अटक केली.प्राथमिक चौकशीत महिलांना स्पामध्ये बॉडी मसाजच्या कामासाठी ठेवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याचे आणि त्यातून आर्थिक फायदा मिळवला जात असल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांखाली तसेच अनैतिक देहव्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाकडून पुढील तपास सुरू आहे.

नवी मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात स्पा सेंटरच्या आड असे प्रकार सुरू असतील, तर संबंधित यंत्रणांना याची माहिती नव्हती का? अशा बोगस स्पा सेंटरवर नियमित कारवाई होणार की फक्त धाडीनंतरच जाग येणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *