शिवरायांचा लोहगड… गुन्हेगारांचा नाही इतिहासाला कलंक लावणाऱ्यांना सोडू नका.
सचिन मयेकर – संपादकीय – छावा न्यूज, रेवदंडा
लोहगड… हे नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अभेद्य दुर्ग. स्वराज्याच्या वैभवाचा, मावळ्यांच्या पराक्रमाचा आणि मराठी अस्मितेचा जिवंत इतिहास. सुरतेच्या मोहिमेनंतर मिळालेल्या संपत्तीचा काही भाग ज्या गडाने आपल्या कुशीत सुरक्षित ठेवला, त्या गडाची ओळख शौर्याने व्हावी, गुन्ह्यांनी नव्हे. मात्र आज त्याच लोहगडाचे नाव एका कथित गुन्हेगारी प्रकरणामुळे देशभर चर्चेत आहे. ही केवळ एका कुटुंबाची वेदना नाही, तर प्रत्येक शिवप्रेमीच्या मनाला लागलेली जखम आहे. स्वराज्याच्या इतिहासाने पावन झालेल्या या भूमीवर अशा प्रकारच्या घटना घडल्याचे आरोप समोर येणे, हे महाराष्ट्रासाठीही चिंतेचे कारण आहे. या प्रकरणात सुरुवातीला अपघाताचा संशय होता. पण कोणताही स्पष्ट धागादोरा नसताना पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही, डिजिटल फॉरेन्सिक, कॉल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे प्रकरणाचा तपास पुढे नेला. सत्य शोधण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांना सलाम केला पाहिजे. अंतिम सत्य काय आहे, याचा निर्णय न्यायालय देईल; मात्र तपासाची दिशा शोधणाऱ्या खाकीचे कौतुक करायलाच हवे. आज आणखी एक प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. लोहगडावर दरवर्षी लाखो पर्यटक येतात. मग प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही का नाहीत? धोकादायक कड्यांवर मजबूत सुरक्षा रेलिंग का नाही? कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचारी आणि आपत्कालीन मदत व्यवस्था का नाही? इतिहास जपण्याइतकेच त्या इतिहासाला भेट देणाऱ्या प्रत्येक जीवाचे रक्षण करणेही सरकार आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे
लोहगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गड आहे. या गडाची ओळख पराक्रमाने राहणार की गुन्ह्यांच्या चर्चेने? इतिहास जपायचा असेल, तर गडांचे संरक्षणही तितक्याच ताकदीने करावे लागेल. लोहगड हा मृत्यूचा नाही… तो स्वराज्याचा अभिमान आहे. या पवित्र भूमीवर गुन्ह्यांची सावली पडू नये. दोषी कोण आहे हे न्यायालय ठरवेल; पण इतिहासाचा अपमान करणाऱ्यांना कायद्यापुढे उत्तर द्यावेच लागले पाहिजे. गड जपा… इतिहास जपा… आणि शिवरायांच्या वारशाचा सन्मान राखा.
![]()

