जिंदाल विद्या मंदिर साळावमध्ये स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष; देशभक्ती, संस्कृती आणि साहसाचा अनोखा संगम

छावा डिजिटल न्युज मीडिया | साळाव| सचिन मयेकर

भारतमातेच्या तिरंग्याला अभिवादन करत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, देशभक्तीची ऊर्जा, भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एकाच मंचावर आणत जिंदाल विद्या मंदिर, साळाव येथे स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगून गेले आणि भारतमातेच्या स्वातंत्र्याचा हा ऐतिहासिक क्षण विद्यार्थ्यांनी अक्षरशः जीव ओतून, आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला.

शाळेचे मुख्याध्यापक मुकेश ठाकूर आणि उपमुख्याध्यापक मंगेश बामनोटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, साहसी प्रात्यक्षिके, देशभक्तीपर सादरीकरणे तसेच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कलाविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली. तिरंगी रंगांनी सजलेल्या मंचावर विद्यार्थ्यांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले साहसी मल्लखांब चे थरारक प्रात्यक्षिक. विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या साथीने संतुलन, धाडस आणि संघभावनेचे दर्शन घडवत दाखवलेल्या या मल्लखांब प्रत्यक्षिकाने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवला. प्रात्यक्षिक पूर्ण होताच सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.

अजय देवगण यांच्या ‘तान्हाजी’ चित्रपटातील जोशपूर्ण ‘रा रा रा’ या गीतावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दमदार नृत्याने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. ताल, लय, जोश आणि उत्साहाने भरलेल्या या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

तिरंगी वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर नृत्य हेही कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. भगवा, पांढरा आणि हिरवा रंग परिधान करून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यातून भारताच्या विविधतेतील एकता आणि राष्ट्रप्रेमाचा सुंदर संदेश देण्यात आला. हातातील तिरंगी रिबिनी, आकर्षक वेशभूषा आणि तालबद्ध हालचालींमुळे मंचावर जणू तिरंग्याचीच रंगत उतरली होती.

या सोहळ्यात शाळेतील शिक्षकांनी सादर केलेला पोतराज समाजाच्या जीवनशैलीवर आधारित कलाविष्कार विशेष लक्षवेधी ठरला. आजही सामाजिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या या उपेक्षित समाजाच्या परंपरा, जीवनशैली आणि संघर्षाचे दर्शन शिक्षकांनी प्रभावीपणे घडवले. त्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाने भारताच्या विविधतेत एकता आणि प्रत्येक भारतीयाच्या मनातील राष्ट्रभावना अधोरेखित केली. शिक्षकांच्या या सादरीकरणाला उपस्थितांनी मनापासून दाद दिली.

या संपूर्ण सोहळ्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून संस्कृती, कला, साहस, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रप्रेम यांची सांगड घालून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे माध्यम आहे.

यावेळी मुख्याध्यापक मुकेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबतही महत्त्वपूर्ण संदेश दिला. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर वाढत असला तरी विद्यार्थ्यांनी त्यावर अतिरेकी अवलंबून न राहता स्वतः अभ्यास करण्याला, स्वतः विचार करण्याला आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नादाला जास्त न लागता स्वतः अभ्यास करा, स्वतःकडे लक्ष द्या, मेहनत करा आणि स्वतःच्या गुणवत्तेवर प्रगती साधा,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

स्वातंत्र्य म्हणजे केवळ गुलामीतून मुक्तता नसून स्वतःच्या विचारांची, ज्ञानाची आणि क्षमतेची ताकद निर्माण करणे देखील आहे, हा संदेश या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.

जिंदाल विद्या मंदिर साळावने भारतमातेच्या ध्वजारोहणाचा क्षण केवळ औपचारिकतेपुरता न ठेवता देशभक्ती, भारतीय संस्कृती, साहस, सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देत स्वातंत्र्याचा उत्सव खऱ्या अर्थाने जगला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणांनी आणि शिक्षकांच्या कल्पक सहभागाने यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *