रिमझिम गिरे सावन… सुलग सुलग जाए मन पावसाच्या रिमझिम सरींमध्ये परड्या हातात घेऊन महिलांनी वडपूजनासाठी केली भक्तिमय गर्दी

छावा न्यूज –२९ जून | सचिन मयेकर, रेवदंडा 

रिमझिम गिरे सावन… सुलग सुलग जाए मन… या अजरामर हिंदी गीताची अक्षरशः अनुभूती आज परिसरात आली. सकाळपासून कोसळणाऱ्या रिमझिम पावसाच्या सरी, हिरवागार निसर्ग आणि भक्तिभावाने नटलेल्या वातावरणात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पावसाची तमा न बाळगता विवाहित महिलांनी पारंपरिक साड्या परिधान करून, हातात पूजेच्या परड्या आणि पूजन साहित्य घेऊन वडाच्या झाडांकडे धाव घेतली. मंदिर परिसर आणि वडाच्या झाडांभोवती महिलांची मोठी गर्दी उसळली होती. पावसाच्या सरी अंगावर झेलत महिलांनी वडाच्या झाडाला पवित्र दोरा गुंडाळून विधिवत पूजा केली आणि पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. यंदा पावसाने वटपौर्णिमेच्या सोहळ्याला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त करून दिले. रिमझिम सरींमध्ये रंगीबेरंगी साड्या, हातातील पूजेच्या परड्या आणि महिलांच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव यामुळे संपूर्ण परिसर प्रसन्न आणि मंगलमय झाला होता.

सावित्रीच्या अढळ निष्ठेची आठवण

वटपौर्णिमेमागे सावित्री–सत्यवान यांची प्रेरणादायी पौराणिक कथा आहे. सत्यवानाचे प्राण घेऊन निघालेल्या यमराजांकडून आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने सावित्रीने सत्यवानाला पुन्हा जीवनदान मिळवून दिले. त्या अढळ निष्ठेच्या स्मरणार्थ विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात. रिमझिम पावसाने आजचा सण आणखी अविस्मरणीय केला. पाऊस, श्रद्धा आणि परंपरा यांचा सुंदर संगम अनुभवत महिलांनी वटपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत श्रद्धेचाही वर्षाव होत असल्याचे चित्र आज सर्वत्र पाहायला मिळाले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *