शिवबा पोरके झाले…राज्याभिषेकाच्या अवघ्या ११ दिवसांत स्वराज्याची माऊली अनंतात विलीन

हा लेख आज सकाळीच वाचकांपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे तो प्रसिद्ध करता आला नाही. उशीर झाला असला तरी स्वराज्याची जननी, राजमाता जिजाऊसाहेबांच्या स्मृतींना वंदन करण्याची वेळ कधीच संपत नाही. छावा परिवारातर्फे राजमाता जिजाऊसाहेबांना कोटी कोटी प्रणाम.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड- सचिन मयेकर | दि. १७ जून २०२६

१७ जून १६७४… हा दिवस इतिहासाच्या पानांवर काळ्या अक्षरांनी लिहिला गेला. रायगडावर राज्याभिषेकाचा सोहळा नुकताच पार पडला होता. संपूर्ण महाराष्ट्र आनंदात न्हाऊन निघाला होता. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले होते. पण या आनंदावर नियतीने दुःखाची छाया टाकली.स्वराज्याची जननी, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी राजमाता जिजाऊसाहेब यांनी पाचाड येथे अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण स्वराज्य शोकसागरात बुडाले.ज्या माऊलीने शिवनेरीच्या किल्ल्यावर बाल शिवबाला रामायण, महाभारत आणि शौर्याच्या कथा सांगितल्या, ज्या माऊलीने अन्यायाविरुद्ध लढण्याचे बाळकडू दिले, ज्या माऊलीने स्वराज्याचे स्वप्न शिवबाच्या मनात रुजवले, तीच माऊली आज कायमची निघून गेली होती.६ जून १६७४ रोजी रायगडावर झालेला शिवरायांचा राज्याभिषेक जिजाऊसाहेबांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला. आयुष्यभर जपलेले स्वप्न पूर्ण झाले होते. गुलामगिरीच्या अंधारातून उभे राहिलेले हिंदवी स्वराज्य आता सिंहासनावर विराजमान झाले होते. पुत्र छत्रपती झाला होता. एका आईसाठी याहून मोठा आनंद कोणता असू शकतो? मात्र राज्याभिषेकाचा आनंद अनुभवून अवघ्या अकराव्या दिवशी राजमाता जिजाऊसाहेब काळाच्या पडद्याआड गेल्या. स्वराज्याचा आधारवड कोसळला. रायगडाच्या दरबारात दुःखाची छाया पसरली. मावळ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. अनेक संकटांना धैर्याने सामोरे जाणारे छत्रपती शिवाजी महाराजही या प्रसंगी हळवे झाले. कारण हा केवळ एका राजमातेचा मृत्यू नव्हता, तर तो एका पुत्राच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात होता. ज्या आईने हात धरून चालायला शिकवले, ज्या आईने स्वराज्याचा मार्ग दाखवला, तीच आई कायमची दूर गेली होती. राजमाता जिजाऊसाहेबांनी केवळ शिवाजी महाराजांना घडवले नाही, तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वाभिमान, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचे संस्कार दिले. त्यांच्याच संस्कारातून शिवराय घडले आणि शिवरायांमधून हिंदवी स्वराज्य उभे राहिले. आजही रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील समाधीसमोर उभे राहिल्यावर प्रत्येक शिवभक्ताचे मस्तक आपोआप झुकते. कारण ती समाधी एका व्यक्तीची नाही, तर स्वराज्याच्या आदिशक्तीची आहे.राजमाता जिजाऊसाहेबांचे शरीर काळाच्या ओघात विलीन झाले, पण त्यांचे विचार, संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहे.

राजमाता जिजाऊसाहेबांना कोटी कोटी प्रणाम.

जय जिजाऊ जय शिवराय 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *