देवाचिये द्वारी _ देऊळ बंद… तरीही हार नाही; अखेर आई एकविराने दिले दर्शन. थेरोंडा परिसरातील सात महिला भाविकांच्या अढळ श्रद्धेची कहाणी पावसाचे संकट, बंद मंदिर आणि पहाटेच्या थरारानंतर अखेर लाभले आई एकविराचे दर्शन
सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज मीडिया | रेवदंडा
जिच्या मनात श्रद्धा असते, तिच्यासाठी देवापर्यंतचा रस्ता कधीच बंद नसतो, याची प्रचिती रेवदंडा परिसरातील सात महिला भाविकांना नुकतीच कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या दर्शनावेळी आली. मुसळधार पाऊस, प्रशासनाने बंद केलेले मंदिर, काळोखी पहाट, निसरड्या पायऱ्या, थकवा आणि निराशा… या सर्व संकटांवर मात करत अखेर त्यांनी आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. हा प्रवास केवळ गड चढण्याचा नव्हता, तर श्रद्धा, चिकाटी आणि भक्तीच्या परीक्षेचा होता.

येथील थेरोंडा परिसरातील सात महिला भाविकांनी आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला गड गाठला. मात्र, तेथे पोहोचताच त्यांना मंदिर बंद असल्याचे सांगण्यात आले. मुसळधार पावसामुळे गडावरील रस्ता आणि पायऱ्यांच्या परिसरात धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने काही दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले होते. या निर्णयाची पूर्वकल्पना नसल्याने एवढा लांबचा प्रवास करून आलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर क्षणभर निराशा पसरली.
मात्र त्या म्हणाल्या, आईच्या दर्शनासाठी आलो आहोत… इतक्या सहज माघार घ्यायची नाही. त्यांनी ओळखीच्या व्यक्तींना संपर्क साधला. काही मार्ग निघतो का, यासाठी प्रयत्न सुरू झाले. अखेर दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजण्यापूर्वी गडावर पोहोचल्यास परिस्थिती समजू शकेल, अशी माहिती त्यांना मिळाली.
पहाटेचा काळोख… पावसाने भिजलेल्या निसरड्या पायऱ्या… सभोवताली दाट धुके… आणि ओठांवर फक्त आई एकविरा चा जप. अशा वातावरणात सातही महिला गड चढू लागल्या. अचानक मागून मोठ्याने शिट्टीचा आवाज आला. क्षणभर सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पण भीतीपेक्षा त्यांच्या मनातील श्रद्धा मोठी होती. त्यांनी एकमेकींचा हात धरला आणि पुन्हा पायऱ्या चढण्यास सुरुवात केली.
अर्धा गड चढल्यानंतर एका महिलेचा थकवा अनावर झाला. माझ्याकडून आता वर चढवत नाही… मी इथेच बसते, असे ती म्हणाली. प्रत्यक्षात काही महिलांनाच पुढे जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. पण दर्शनाची ओढ सर्वांच्या मनात सारखीच होती. इतर महिलांनी तिला धीर दिला. इतक्या दूर आलोत अर्ध्या वाटेत सोडणार नाही, असे म्हणत तिचा हात धरला आणि पुन्हा सर्वजणी पुढे निघाल्या.
पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचताच त्यांना पुन्हा अडविण्यात आले. मंदिरातील एका पुजाऱ्याने, तुम्हाला कोणी पाठवलं? देऊळ बंद आहे… हे माहीत नाही का? असा प्रश्न विचारला. त्या क्षणी सर्व महिला शांतपणे उभ्या राहिल्या. त्यांनी नम्रपणे एवढेच सांगितले, रेवदंड्यातून फक्त आईच्या दर्शनासाठी आलो आहोत. दर्शनाशिवाय परत जायचे नाही.
तरीही तत्काळ परवानगी मिळाली नाही. सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे दिसत होते. इतका प्रवास करूनही आता रिकाम्या हाताने परतावे लागणार, अशी भावना त्यांच्या मनात दाटून आली. काहींच्या डोळ्यांत अश्रूही तरळले. पण भक्ती कमी झाली नाही. त्यांनी मंदिराबाहेर उभे राहून आईचे नामस्मरण सुरूच ठेवले
आणि त्याच क्षणी जणू आई एकविराने आपल्या भक्तांची परीक्षा संपवली…
मंदिराच्या आतील बाजूने दुसरे पुजारी बाहेर आले. त्यांनी या महिला भाविकांची श्रद्धा, संयम आणि चिकाटी पाहिली. काही क्षण संवाद झाल्यानंतर त्यांनी मंदिरात प्रवेशाची परवानगी दिली.
बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे उघडले… समोर आई एकविराचे तेजस्वी रूप दिसले… आणि सातही महिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. अनेक तासांचा प्रवास, पावसातील संघर्ष, भीती, थकवा आणि निराशा एका क्षणात विरून गेली. प्रत्येकाच्या ओठांवर एकच शब्द होता आईने अखेर हाक ऐकली
रेवदंडा परिसरात परतल्यानंतर आजही त्या महिला हा प्रसंग सांगताना भावूक होतात. त्यांच्या मते, हा प्रवास फक्त गड चढण्याचा नव्हता; तो श्रद्धा, विश्वास आणि भक्तीच्या परीक्षेचा होता. संकटे कितीही मोठी असली, तरी मनापासून केलेली भक्ती कधीही वाया जात नाही, हा अनुभव त्या आयुष्यभर विसरणार नाहीत.
![]()

