सुमारे ४0 वर्षांची पाण्याची टाकी धोकादायक अवस्थेत कधीही कोसळण्याची भीती रेवदंडा ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे पत्र

सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज मीडिया | रेवदंडा 

रेवदंडा येथील मारुती आळी परिसरातील सुमारे ४0 ते ४५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली उमटे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची उंच पाण्याची टाकी अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचली असून ती कधीही कोसळून मोठी जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडाने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तातडीने नवीन पाण्याची टाकी उभारण्याची मागणी केली आहे.

सरपंच प्रफुल्ल यशवंत मोरे यांच्या स्वाक्षरीने ३० जुलै २०२६ रोजी पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, मारुती आळी येथील ही पाण्याची टाकी उमटे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अनेक दशकांपूर्वी उभारण्यात आली होती. मात्र आता या टाकीचे बांधकाम मोठ्या प्रमाणात जीर्ण झाले असून काँक्रीटचे भाग पडू लागले आहेत. टाकीतील स्टीलचे सळई उघड्या पडल्या असून लोखंडी जिनाही पूर्णपणे गंजून धोकादायक झाला आहे. काही भाग खाली कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायतीने या पत्रासोबत टाकीची छायाचित्रेही जोडली असून सद्यस्थितीत ही रचना नागरिकांसाठी मोठा धोका ठरत असल्याचे स्पष्ट केले आहे. भविष्यात टाकीचा कोणताही भाग अथवा संपूर्ण रचना कोसळल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तातडीने जुनी टाकी उतरवून त्याच ठिकाणी नवीन व सुरक्षित पाण्याची टाकी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनाही आवश्यक माहिती व पुढील कार्यवाहीसाठी पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे. आता जिल्हा प्रशासन व संबंधित विभाग या गंभीर प्रश्नाकडे कितपत तातडीने लक्ष देतात, याकडे रेवदंडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *