रविवार विशेष – करंजेची शीतल छाया…
छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल – दिनांक १७ मे २०२६- रविवार
करंज’ हा एक बहुपर्णी, बहुपयोगी वृक्ष आहे. करंज हे झाड शिशिर ऋतूत(फेब्रुवारी/मार्च) आपली सर्व जुनी पाने कात टाकावी तसे गाळून टाकते, आणि चैत्रात त्याला जी नवीन पालवी फुटते तेव्हा पानापानांत जमिनीतील पाणी साठवून तुकतुकीत अशा हिरव्यागार पानांनी बहरलेल्या डेरेदार वृक्षामध्ये त्याचे रूपांतर होते.
संतोष राईलकर— चौल
साधारण बारा ते पंधरा फूट उंच आणि तेवढीच रूंद असलेली ही झाडे आपल्याला कोकणात खास करून खाडीकिनारी आढळतात, पण तशी ती सर्व प्रकारच्या जमिनीत होऊ शकतात. त्याला करंजीच्या आकाराची चपटी शेंगफळे धरतात, ज्याच्या आतमध्ये असलेल्या बियांपासून अखाद्य कडू तेल बनते. या तेलापासून पुढे बायोडिझेल आणि ग्लिसरीन अशी दोन उत्पादने प्रक्रिया करून काढता येतात. तसेच कच्चे कडू तेल सर्व प्रकारच्या जखमांवर आणि त्वचारोगावर उपयोगी आहे. शिशीर ऋतूत गळलेल्या पानांचे छान खत तयार होते. नंतर जवळजवळ वर्षभर हे झाड हिरवेगार आणि बारीक फुलांनी फुललेले राहते, ज्यावर अनेक कीटकांचे, मधमाश्या,भुंगे आदिंचे पोषण होते.
खड्डेविरहित काळाशार डांबरी रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा करंजेची थंडगार सावली देणारी झाडे, जवळून वाहणारी एखादी खाडी किंवा नदी असेल तर तुम्ही चालत फिरा वा गाडीने, हा रणरणता उन्हाळा सुद्धा तुम्हाला स्वर्गीय सुख देऊन जाईल आणि ‘झुमरू’ या चित्रपटातील किशोरकुमारचे गाणे नकळत तुमच्या ओठांवर येईल – ऐसे मै चल रहा हूॅं, पेडों की छॉंव में, जैसे कोई सितारा बादल की गॉंव में…ठंडी हवा ये चांदनी सुहानी.
![]()

