प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंगचा थरारक खेळ? नागपुरात तरुणीचा गंभीर आरोप; धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही दावा
छावा तर्फे नागरिकांना आवाहन
आजच्या डिजिटल युगात विश्वासाच्या नात्यांचा गैरफायदा घेत महिलांना ब्लॅकमेल करून ओळखी, मैत्री आणि विश्वास यांच्या नावाखाली अनेकजण फसवणूक, ब्लॅकमेलिंग, शारीरिक आणि आर्थिक शोषणाचे बळी ठरत आहेत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर लगेचच अंधविश्वास ठेवू नका. सोशल मीडिया, मोबाईल किंवा वैयक्तिक ओळखीतून निर्माण झालेल्या संबंधांमध्ये सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.कोणत्याही अनोळखी किंवा नव्याने परिचित झालेल्या व्यक्तीसोबत एकांतात जाणे, वैयक्तिक माहिती, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणे टाळावे. संशयास्पद हालचाली, धमक्या किंवा ब्लॅकमेलिंगचा प्रकार घडल्यास भीती न बाळगता तात्काळ पोलिसांकडे तक्रार द्यावी. विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवून.एक चुकीचा निर्णय आयुष्यभराची वेदना देऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या कुटुंबीयांनाही अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत जागरूक करा.
छावा तर्फे जनहिताचे आवाहन मैत्री करा, पण पडताळणी करून विश्वास ठेवा, पण स्वतःची सुरक्षा विसरू नका.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | नागपूर | दि. १६ जून २०२६
नागपुरात एका २४ वर्षीय तरुणीने केलेल्या गंभीर तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे. विश्वास संपादन करून भेटीस बोलावणे, गुंगीचे औषध देऊन आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ तयार करणे, त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा धक्कादायक आरोप संबंधित तरुणीने केला आहे. तक्रारीनुसार, आरोपीने सुरुवातीला मैत्रीच्या माध्यमातून तरुणीचा विश्वास जिंकला. त्यानंतर एका भेटीदरम्यान तिला कथितपणे गुंगीचे औषध देण्यात आले. या अवस्थेचा गैरफायदा घेत तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. पुढे हेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर दबाव टाकण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तरुणीच्या म्हणण्यानुसार, या धमक्यांच्या जोरावर तिच्याकडून मोठ्या प्रमाणात पैशांची उकळपट्टी करण्यात आली. तसेच वारंवार तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यात आले. एवढेच नव्हे तर तिच्या इच्छेविरुद्ध काही धार्मिक विधी करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही गंभीर आरोप तिने केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी मुख्य आरोपीसह आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. कथित धार्मिक विधी करणाऱ्या तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू असून, पोलिस विविध पुरावे आणि आरोपांची कसून पडताळणी करत आहेत. या प्रकरणातील आरोपांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडिया, मोबाईल अॅप्स आणि वैयक्तिक ओळखींचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांकडून महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याच्या घटना अधूनमधून समोर येत असतात. त्यामुळे अशा घटनांकडे केवळ गुन्हा म्हणून नव्हे, तर सामाजिक जागृतीच्या दृष्टीनेही पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोन, डिजिटल उपकरणे आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपी आणि पीडित महिलेमधील आर्थिक व्यवहार, संपर्काची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समोर आल्यानंतर विविध सामाजिक संघटना आणि महिला सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या घटकांनी अशा गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. महिलांना ब्लॅकमेल करून किंवा भीती दाखवून त्यांचे शोषण करणाऱ्यांवर कायद्याचा कठोर बडगा उगारला जावा, अशी मागणी होत आहे.
![]()

