लग्नाचे आमिष, शारीरिक शोषण अन् अश्लील व्हिडिओची धमकी; माजी सरपंच जेरबंद
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | पेण | दि. ३१ मे २०२६
पेण तालुक्यातील नरदासचाळ परिसरात लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेशी दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवत तिचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून पेण पोलिसांनी एका माजी सरपंचाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी सरपंच असून सन २०१८ पासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत पीडित महिलेला आपल्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेऊन तिच्याशी विवाह करणार असल्याचे आश्वासन देत होता. या आश्वासनावर विश्वास ठेवून महिलेने आरोपीशी संबंध ठेवले. मात्र, कालांतराने आरोपीने विवाहास टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपीने महिलेसोबतच्या खासगी क्षणांचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला. या प्रकारामुळे महिला प्रचंड मानसिक तणावाखाली गेल्याचेही तिने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पेण पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी २७ मे २०२६ रोजी आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या प्रकरणामुळे पेण तालुक्यात मोठी चर्चा रंगली असून एका लोकप्रतिनिधीवर झालेल्या गंभीर आरोपांमुळे नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पेण पोलीस करत आहेत.
ठळक मुद्दे
लग्नाचे आश्वासन देऊन फसवणुकीचा आरोप
२०१८ ते २०२६ दरम्यान संबंध ठेवल्याचा दावा
अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप
माजी सरपंचाला अटक; न्यायालयाकडून पोलीस कोठडी
पेण पोलिसांकडून पुढील तपास सुरू
![]()

