उद्यापासून बँकिंगला मोठा ब्रेक ११ सप्टेंबरला देशव्यापी संप; ग्राहकांची धावपळ होण्याची शक्यता, पुढे तीन दिवसांचा संप अन् बेमुदत संपाचा इशारा

छावा डिजिटल न्यूज मीडिया सचिन मयेकर, मुंबई ता..१0 ९/०९/२६

 देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे उद्या, ११ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील बँकिंग सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) एकदिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली असून, SBI, PNB, UCO Bank, Indian Bank आणि Bank of Maharashtra यांसह अनेक बँकांनी संभाव्य कामकाजातील अडथळ्याबाबत ग्राहकांना सूचना दिल्या आहेत.

पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करा, PLI योजनेबाबतचे मतभेद दूर करा आणि पेन्शनसह प्रलंबित प्रश्न सोडवा, या प्रमुख मागण्यांसाठी बँक संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकार आणि संघटनांमध्ये चर्चा होऊनही समाधानकारक तोडगा निघालेला नसल्याने संपाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.

संपामुळे शाखांमधील रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स, ग्राहक सेवा आणि इतर प्रत्यक्ष बँकिंग कामांवर परिणाम होऊ शकतो. बँकांनी आवश्यक व्यवस्था करण्याचे सांगितले असले तरी कर्मचारी संपात सहभागी झाल्यास शाखा आणि कार्यालयांचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. SBIनेही संपामुळे कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

 काही भागांत सलग चार दिवस बँकिंग सेवांना फटका?

११ सप्टेंबरनंतर १२ सप्टेंबरला दुसरा शनिवार आणि १३ सप्टेंबरला रविवार असल्याने देशभरातील बँकांना नियमित सुट्टी आहे. त्यानंतर १४ सप्टेंबरला काही राज्यांमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त बँक सुट्टी आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये प्रत्यक्ष शाखा सेवा सलग चार दिवस प्रभावित होऊ शकतात.

मात्र ही सलग चार दिवसांची बंदी संपूर्ण देशभर समान असेल असे नाही, कारण १४ सप्टेंबरची सुट्टी राज्यनिहाय आहे.

 संप इथेच थांबणार नाही…

बँक संघटनांनी २८, २९ आणि ३० सप्टेंबरला तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. मागण्यांवर तोडगा न निघाल्यास २६ ऑक्टोबर २०२६पासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये बँकिंग क्षेत्रातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

बँक ग्राहकांनी त्यामुळे अत्यावश्यक रोख व्यवहार, चेक, कर्जासंबंधी कामे किंवा शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून करावयाची कामे डिजिटल बँकिंग सेवा उपलब्ध राहण्याची शक्यता असली तरी शाखास्तरीय सेवांमध्ये विलंब किंवा अडथळे येऊ शकतात.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *