रेवदंड्यात महसूल शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद – विविध दाखल्यांचे मोफत वाटप

छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर | दिनांक : ०५ मे २०२६

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता भंडारी समाज हॉल, रेवदंडा बीच शेजारी येथे हे शिबीर पार पडले.

या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उतारे, उत्पन्न, रहिवासी व जातीचे दाखले, नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) संदर्भातील मार्गदर्शन, सनद प्रक्रिया, सामाजिक योजनांचे लाभ, विद्यार्थ्यांसाठी दाखले, वर्ग २ ते वर्ग १ जमीन रूपांतर, तुकडेबंदी प्रकरणे, घरपट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज तसेच अॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी यांसारख्या अनेक सेवांचा समावेश होता.

विशेष म्हणजे, सर्व प्रकारचे दाखले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

या कार्यक्रमाला तहसीलदार अलिबाग श्री. विक्रम पाटील तसेच उपविभागीय अधिकारी श्री. मुकेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ, पंचायत समिती सदस्य शरद गोंधळी, रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे, मंडळ अधिकारी सुदर्शन सावंत, ग्राम महसूल अधिकारी राजेंद्र पाटील, शीतल म्हात्रे, शुभम चेरू, तेजस्विनी काळे तसेच महसूल सेवक विष्णू पोसणे, महेंद्र नाईक, सचिन पाटील, संदीप पाटील, दिपक पाटील, ममतेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरामुळे नागरिकांची प्रशासकीय कामे जलदगतीने मार्गी लागली असून शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमाचे उत्तम उदाहरण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *