रेवदंड्यातून ‘माय दे देऊस’ पालखीचा जल्लोष; कोर्लई ख्रिश्चन समाजाची ४०० वर्षांची परंपरा आजही दिमाखात जिवंत
छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर | दिनांक : ०५ मे २०२६
![]()
![]()
![]()
कोकण किनारपट्टीवरील रेवदंडा–कोर्लई परिसरात आज ५ मे रोजी श्रद्धा, परंपरा आणि एकात्मतेचा संगम अनुभवायला मिळाला. कोर्लई येथील ख्रिश्चन समाजाकडून दरवर्षी साजरा होणारा ‘माय दे देऊस’ उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.
रेवदंड्यातील ‘माय दे देऊस’ चर्चमधून मदर मेरीची सजवलेली पालखी बँड, ढोल आणि प्रार्थनांच्या गजरात वाजत-गाजत गावात फिरवण्यात आली. पालखी गावातील प्रमुख मार्गांवरून फिरत असताना नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले.
रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत करत धार्मिक सौहार्दाचे जिवंत चित्र उभे केले.

“माय दे देऊस” म्हणजे पोर्तुगीज भाषेत देवाची आई – मदर मेरी. पोर्तुगीज काळात सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. रेवदंडा आणि कोर्लई या दोन गावांमधील धार्मिक नाळ या उत्सवामुळे आजही घट्ट जोडलेली आहे.
स्थानिकांच्या मते, अनेक भाविक नवस फेडण्यासाठी दरवर्षी या पालखीमध्ये सहभागी होतात, तर काही कुटुंबांसाठी हा उत्सव पिढ्यानपिढ्या चालत आलेला श्रद्धेचा भाग आहे.
दरम्यान, या सोहळ्यामुळे संपूर्ण रेवदंडा गावात दिवसभर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. पर्यटकांनीही या अनोख्या परंपरेचा अनुभव घेत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
धर्म वेगळे, पण भावना एकच. रेवदंड्यातून निघणारी ‘माय दे देऊस’ पालखी ही केवळ धार्मिक मिरवणूक नाही… ती कोकणच्या मातीतील एकात्मतेची जिवंत परंपरा आहे.
![]()


