पनवेलमध्ये आईची हैवानियत उघड; चिमुरडीला मारहाण, माफी मागितली… पोलीस तपास सुरू… गुन्हा दाखल होणार

छावा न्यूज – पनवेल | विशेष संपादकीय.

या बातमीसोबत दोन व्हिडिओ खाली जोडले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये चिमुरडीला मारहाण झाल्याचे दृश्य दिसते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये संबंधित आई शाळा व्यवस्थापन समितीसमोर माफी मागताना दिसत असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू  आहें.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी संबंधित पालकांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, उपलब्ध पुरावे आणि जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे समजते. 

पनवेल तालुक्यातील नांदगाव येथे घडलेली चिमुरडीवरील मारहाणीची घटना प्रत्येक संवेदनशील माणसाच्या मनाला चटका लावणारी आहे. सुरुवातीला या प्रकरणात अनेक अफवा पसरल्या, मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार व्हिडिओमध्ये चिमुरडीला मारहाण करणारी महिला ही तिची स्वतःची आई असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित आईने शाळा व्यवस्थापन समितीसमोर आपली चूक मान्य करत लेखी माफीनामा दिल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. आई ही मुलासाठी पहिली गुरू, पहिली संरक्षक आणि पहिली देवता मानली जाते. तिच्या कुशीत मुलाला माया, प्रेम आणि सुरक्षितता मिळते. मात्र त्याच आईच्या हातून एका निष्पाप चिमुरडीवर मारहाण झाल्याची घटना समोर येणे ही अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक बाब आहे. रागाच्या भरात असो वा कोणत्याही कारणाने, लहान मुलावर हात उगारणे कधीही योग्य ठरू शकत नाही. लहान मुलांवर होणारी कोणतीही मारहाण ही अत्यंत निंदनीय आहे. अशा घटना समाजाने कधीही सहन करू नयेत. चिमुकल्यांच्या मनावर होणाऱ्या जखमा आयुष्यभर राहू शकतात. म्हणूनच या प्रकरणात पोलीस प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता सखोल तपास करून लागू असलेल्या कायद्यांनुसार गुन्हा दाखल करावा. दोष सिद्ध झाल्यास संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई करून असा स्पष्ट संदेश द्यावा की, बालकांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. ही घटना प्रत्येक पालकासाठीही मोठा धडा आहे. मुलांना घडवण्यासाठी मारहाण नव्हे, तर संयम, संवाद आणि प्रेमाची गरज असते. मुलांच्या चुका सुधारण्याचा मार्ग हिंसा असू शकत नाही. सोशल मीडियाच्या युगात अफवा किती वेगाने पसरतात, हेही या प्रकरणातून दिसून आले. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीबाबत निष्कर्ष काढण्यापूर्वी सत्य पडताळणे ही माध्यमांची आणि समाजाची जबाबदारी आहे. त्याचवेळी बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेणे ही प्रशासनाचीही तितकीच मोठी जबाबदारी आहे. चिमुकल्यांच्या डोळ्यांत अश्रू नव्हे, तर हसू फुलले पाहिजे. त्यांच्या मनात भीती नव्हे, तर विश्वास निर्माण झाला पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आणि सामाजिक जनजागृती ही काळाची गरज आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *