उल्वेतील दुहेरी हल्ला प्रकरणी आरोपीला जन्मठेप वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला, चोरी आणि खूनप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाचा सनसनाटी निकाल

छावा डिजिटल मीडिया – पनवेल — राजेश बाष्टे — दिनांक : ०८ मे २०२६

उल्वे परिसरात वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करून खून व चोरी करणाऱ्या आरोपी संदीप गुप्ताला पनवेल जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश उगले साहेब यांनी दिलेल्या या निकालामुळे संपूर्ण परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

दिनांक ०७ मे २०२६ रोजी न्यायालयाने आरोपी संदीप गुप्ता, रा. उल्वे याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३०७, ३९४ आणि ३९७ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप व ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. याशिवाय दोन स्वतंत्र गुन्ह्यांत प्रत्येकी सात वर्षांचा सश्रम कारावासाचीही शिक्षा सुनावण्यात आली.

पैशाच्या वादातून घडला थरारक प्रकार

मृत रामप्रसाद गुप्ता आणि त्यांची पत्नी लक्ष्मीदेवी हे उल्वे येथील फ्लॅटमध्ये एकटे राहत होते. त्यांची मुले इतरत्र राहत असल्याने वृद्ध दाम्पत्य एकटेच वास्तव्य करत होते. आरोपी संदीप गुप्ता हा त्यांच्या मुलगा सतीशचा मेव्हणा होता. आरोपीने रामप्रसाद यांच्याकडून ७० हजार रुपये उसने घेतले होते. ही रक्कम परत मागितल्याच्या रागातून आरोपीने कट रचल्याचे तपासात समोर आले.

२२ एप्रिल २०२६ रोजी आरोपी संदीप हा रामप्रसाद यांच्या घरी गेला. लक्ष्मीदेवी स्वयंपाकघरात चहा बनवत असताना आरोपीने रामप्रसाद यांना बेडरूममध्ये नेऊन चाकूने वार करत त्यांचा खून केला. त्यानंतर बेडरूममध्ये आलेल्या लक्ष्मीदेवींवरही गळ्यावर वार करून त्यांना बाथरूममध्ये आपटण्यात आले.

यानंतर आरोपीने घरातील कपाटातून सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोकड लंपास करून घटनास्थळावरून पलायन केले.

जखमी पत्नीची धाडसी नोंद ठरली निर्णायक

गंभीर जखमी अवस्थेत असतानाही लक्ष्मीदेवींनी इमारतीखाली येत एका साक्षीदारासमोर इंग्रजी वर्तमानपत्रावर “Satish ke saale ne mere pati ko mara” असे लिहून ठेवले. ही नोंद आणि त्यानंतर दिलेली साक्ष न्यायालयीन प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची ठरली. तातडीने उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.

या प्रकरणाचा तपास त्यावेळी पोलीस उपाधीक्षक असलेल्या Smita Jadhav यांनी केला होता. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील वाय. एस. भोपी यांनी जोरदार युक्तिवाद केला. तब्बल दोन वर्ष चाललेल्या सुनावणीत १६ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.

दागिने व रोकड फिर्यादीस परत देण्याचे आदेश

न्यायालयाने आरोपीवर दंड ठोठावताना चोरीस गेलेले दागिने व ८० हजार रुपयांची रक्कम फिर्यादी लक्ष्मीदेवी यांना परत देण्याचे आदेशही दिले आहेत.

या खटल्यात पोलीस अधिकारी वाघचौरे, गिरासे तसेच साक्षीदारांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे न्यायालयात नमूद करण्यात आले. वृद्ध आणि निराधार व्यक्तींच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन गुन्हे करणाऱ्यांविरोधात न्यायालयाने दिलेला हा कठोर संदेश असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *