BREAKING | अलिबाग तालुक्यातील आरोपीचा भांडाफोड ‘ISRO सायंटिस्ट’ बनून मॅट्रिमोनिअल साईटवर महिलांची लाखोंची फसवणूक, फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत सलग गुन्हे उघड
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल अलिबाग २१ एप्रिल २०२६
सचिन मयेकर
मॅट्रिमोनिअल साईटवर गोड बोलून विश्वास संपादन करणे, लग्नाचं आमिष दाखवणे आणि त्यानंतर लाखो रुपयांची फसवणूक करणे असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी आदर्श प्रशांत म्हात्रे (वय ३४) हा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रहिवासी असून, त्याने वेगवेगळ्या नावांनी स्वतःची ओळख बदलत महाराष्ट्रभर महिलांना गंडा घातल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
आरोपी स्वतःला कधी ISRO मधील शास्त्रज्ञ तर कधी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत असे. त्यासाठी बनावट ओळखपत्रे, खोटे आधार तपशील आणि आकर्षक जीवनशैली दाखवणारे फोटो वापरून तो विश्वासार्ह प्रतिमा तयार करत होता. Shaadi.com, Jeevansathi, Tinder यांसारख्या मॅट्रिमोनिअल आणि डेटिंग प्लॅटफॉर्मवरून तो विशेषतः उच्चशिक्षित महिलांशी संपर्क साधत असे.
“लग्नानंतर भविष्य सुरक्षित करूया”, “प्लॉटमध्ये गुंतवणूक करूया” अशा आमिषांखाली तो महिलांकडून पैसे उकळत असे. काही प्रकरणांमध्ये महिलांना स्वतःच्या नावावर प्री-अप्रूव्ह्ड कर्ज काढायला लावून ती रक्कम आरोपीकडे वळवली जात होती.
फेब्रुवारी २०२६ मध्ये नवी मुंबई येथे या आरोपीने सुमारे ९६.९७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता आणि त्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये पुणे येथील एका महिलेला तब्बल २६ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले. या प्रकरणात येरवडा पोलिसांनी १५ एप्रिल रोजी आरोपीला अटक केली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे या ठिकाणी अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तो यापूर्वीही अनेक वेळा अटक झाला असून, प्रत्येक वेळी नाव व ओळख बदलून पुन्हा गुन्हे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. फसवणुकीतून मिळालेली रक्कम गोव्यातील कॅसिनो, लक्झरी हॉटेल्स आणि ऐषआरामी जीवनावर खर्च केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नवी मुंबई क्राईम ब्रांच आणि पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी किती महिला या जाळ्यात अडकल्या आहेत याचा शोध घेतला जात आहे.
या संपूर्ण घटनेमुळे ऑनलाइन मॅट्रिमोनिअल साईट्सवरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवताना आणि आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
![]()

