पावसाळ्यापूर्वी अलिबाग–रेवदंडा मार्ग पूर्ण होणार तरी का? अर्धवट मोऱ्या धुळीचे लोळ आणि अपघातांनी नागरिक त्रस्त ‘छावा’कडे संतप्त प्रतिक्रिया
छावा डिजिटल मीडिया – अलिबाग — सचिन मयेकर — दिनांक : ०८ मे २०२६
अलिबाग–रेवदंडा मार्गावरील संथ आणि विस्कळीत रस्ते कामांमुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून आता पावसाळा तोंडावर आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ते खोदून ठेवणे, मोऱ्यांची अर्धवट कामे, उघडे खड्डे, धुळीचे प्रचंड लोळ आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालक, ग्रामस्थ आणि पर्यटक अक्षरशः हैराण झाले आहेत.
विशेष म्हणजे, “छावा”कडे अनेक नागरिकांनी संपर्क साधत या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्याची मागणी केली आहे. “फक्त अपघाताच्या बातम्या नव्हे, तर अशा गंभीर प्रश्नांवर पत्रकारांनी शासनाला जागे करणे आवश्यक आहे,” अशा प्रतिक्रिया वाचकांकडून व्यक्त होत आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदारांकडून त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त अंतराचे रस्ते एकाचवेळी खोदून ठेवले जात आहेत. मात्र ही कामे मुदतीत पूर्ण होणे शक्य नसतानाही नागरिकांच्या माथी हा त्रास मारला जात असल्याचा आरोप होत आहे. मागील काही महिन्यांत मुरूड, अलिबाग आणि रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले असून काही नागरिकांनी आपला जीवही गमावला आहे.
दरम्यान, अलिबाग–रेवदंडा मार्गावरील निकृष्ट आणि संथ कामामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड धूळ उडत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बगमाळा ते चौल–मुखरी गणपती मंदिर परिसरातील अनेक मोऱ्यांची कामे अजूनही अर्धवट स्थितीत पडून आहेत. काही ठिकाणी मोऱ्या उघड्या असून, काही ठिकाणी फक्त बॅरिकेट्स लावून काम महिनोनमहिने तसेच ठेवण्यात आले आहे.
स्थानिकांच्या मते, ही परिस्थिती पाहता पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होईल, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. जर पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण झाली नाहीत, तर गेल्या वर्षी साळव ते चोरढे दरम्यान निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, शासन, बांधकाम विभाग आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकाराकडे डोळेझाक करत असून कामाच्या दर्जावर आणि गतीवर कोणाचाही वचक राहिलेला दिसत नाही.
*“छावा”*कडे आलेल्या प्रतिक्रियांमध्ये नागरिकांनी स्पष्टपणे म्हटले आहे की,
“रस्ते विकासाच्या नावाखाली नागरिकांना त्रास, धूळ, अपघात आणि जीवितहानी दिली जात असेल, तर अशा कामांवर कठोर प्रश्न विचारणे गरजेचे आहे.”
स्थानिकांच्या मते, रस्त्यावर नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाण्याची फवारणी होत नसल्याने धुरळा पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेला आहे. काही ठिकाणी दिवसेंदिवस धुळीचे लोट उडत असून वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसेनासा होत आहे. परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जर वेळेवर पाण्याचा मारा केला गेला असता, तर धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला असता.
आता पावसाळा अगदी तोंडावर असताना प्रशासन आणि संबंधित यंत्रणा जागी होणार का? की नागरिकांना पुन्हा एकदा चिखल, खड्डे आणि जीवघेणा प्रवास सहन करावा लागणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
![]()

