फेसबुक मैत्रीचं जाळं आणि लाखोंचा घाव बेलोशीतील इसमाला ऑनलाईन गंडा ६. १६ लाखांचा चुना
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,बेलोशी १२ एप्रिल २०२६
सचिन मयेकर
“मैत्री”च्या नावाखाली सोशल मीडियावर विणलं जाणारं फसवणुकीचं जाळं किती भयानक असू शकतं, याचं जिवंत उदाहरण बेलोशी येथे समोर आलं आहे. एका अज्ञात महिलेच्या गोड बोलण्याला बळी पडत एका इसमाने तब्बल रू ६. १६ लाख गमावले आहेत.
घडलेलं असं की, बेलोशीतील ४७ वर्षीय परेश गुंड यांच्याशी फेसबुकवरून एका महिलेने संपर्क साधला. सुरुवातीला साधी ओळख… नंतर रोजचं चॅटिंग… आणि मग व्हॉईस कॉल अशा टप्प्याटप्प्याने विश्वास जिंकत ही “मैत्री” पुढे गेली. यानंतर सुरू झाला खरा खेळ ऑनलाईन बिझनेस, मोठा नफा, झटपट कमाई अशा आमिषांनी परेश यांना गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आलं. एका मोबाईल लिंकवर क्लिक करताच व्यवहारांची साखळी सुरू झाली आणि युपीआयद्वारे एकूण ₹6,16,113.40 इतकी रक्कम हळूहळू काढून घेण्यात आली. पैसे गेल्यावर मात्र संपर्क तुटला आणि तेव्हा उघड झाली फसवणूक.
घटनेनंतर परेश गुंड यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 46/2026 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66D तसेच भारतीय न्याय संहिता कलम 318 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे पुढील तपास करत आहेत. सोशल मीडियावरील “गोड बोलणं” म्हणजे सापळा असू शकतो. अनोळखी व्यक्ती अचानक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते, काही दिवसांत जवळीक निर्माण होते, गुंतवणूक करा, नफा मिळवा असा दबाव, लिंकद्वारे पैसे ट्रान्सफर… आणि मग गायब.
पोलीसांचा इशारा
“झटपट पैसा” हा अनेकदा फसवणुकीचा सिग्नल असतो. अशा आमिषांना बळी पडू नका, कोणतीही लिंक किंवा व्यवहार करण्यापूर्वी खात्री करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
![]()

