संपादकीय – ब्लॅकनेल करून तरुणीच्या शरीराचे लचके तोडले दहा महिने चार आरोपी एक व्हिडिओ या घटनेने दिला डिजिटल युगाचा मोठा इशारा

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | दि. ०४ जून २०२६

हेच ते नराधम

काल कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड परिसरातून समोर आलेल्या कथित सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एका 19 वर्षीय कॉलेज तरुणीला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिचे फोटो आणि व्हिडिओंचा गैरवापर करत तब्बल 10 महिने ब्लॅकमेल केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

मात्र 24 तास उलटल्यानंतर प्रश्न फक्त एवढाच नाही की आरोपींना शिक्षा होईल का? तर प्रश्न आहे की अशा घटना वारंवार का घडतात आणि त्या रोखायच्या कशा?

काल नेमकं काय घडलं?

तक्रारीनुसार, मुख्य आरोपीने ओळखपत्र बनवून देण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीशी संपर्क वाढवला. त्यानंतर तिचे फोटो मिळवून त्यांचा गैरवापर केला गेला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला मानसिक दबावाखाली ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. पुढे इतर आरोपींनाही या प्रकरणात सहभागी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहें शेवटी अंतिम क्षणात पीडितेने धाडसाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर कारवाईला वेग आला आणि संबंधित आरोपींना अटक करण्यात आली.

न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून तपास यंत्रणा इलेक्ट्रॉनिक पुरावे, मोबाईल डेटा आणि व्हिडिओंची पडताळणी करत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातीलच आणखी एका प्रकरणामुळेही खळबळ उडाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना जाळ्यात ओढून ब्लॅकमेल केल्याचे आरोप समोर आले आहेत. हा इशारा फक्त कोल्हापूरपुरता नाही आज अनेक गुन्ह्यांमध्ये एक समान सूत्र दिसते— सोशल मीडिया → मैत्री → विश्वास → खासगी फोटो/व्हिडिओ → ब्लॅकमेल ब्लॅकमेल करणाऱ्यांचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे पीडितेची भीती. बदनामी होईल, कुटुंबाला कळेल, समाज काय म्हणेल या भीतीमुळे अनेकजण गप्प राहतात. याचाच गैरफायदा गुन्हेगार घेतात.सोशल मीडियावरील प्रत्येक ओळख विश्वासार्ह असेलच असे नाही. वैयक्तिक फोटो, व्हिडिओ किंवा कागदपत्रे कोणालाही सहज पाठवू नका. कोणताही दबाव आल्यास तात्काळ विश्वासू व्यक्तीशी बोला. मुलांवर केवळ लक्ष ठेवू नका, त्यांच्याशी संवादही ठेवा. “काहीही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत” हा विश्वास मुलांना मिळाला तर अनेक घटना वेळेत उघडकीस येऊ शकतात. पीडितेला दोष देऊ नका. गुन्हेगाराला शिक्षा व्हावी यासाठी पीडितेला आधार द्या. मौन तोडणे हेच अनेकदा न्याय मिळवण्याचे पहिले पाऊल असते. कालची घटना आजची हेडलाईन आहे. पण उद्या ती आपल्या घरातील, आपल्या गावातील किंवा आपल्या कुटुंबातील कोणाचीही शोकांतिका बनू नये, यासाठी जागरूकता, डिजिटल साक्षरता आणि कायद्यावरील विश्वास आवश्यक आहे.डिजिटल युगात मोबाईल हातात असणे महत्त्वाचे आहे; पण त्याहून महत्त्वाचे आहे विवेक डोक्यात असणे.

महिलांसाठी महत्त्वाचे आवाहन 

कोणतीही व्यक्ती तुमचा विनयभंग करत असेल, अश्लील संदेश पाठवत असेल, फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत असेल, धमक्या देत असेल किंवा मानसिक त्रास देत असेल तर गप्प बसू नका.

📞 महिला हेल्पलाइन – 181

📞 महिला सुरक्षा हेल्पलाइन – 1091

📞 आपत्कालीन सेवा – 112

📞 पोलीस मदत – 100

📞 सायबर गुन्हे / ऑनलाइन ब्लॅकमेल – 1930

अन्याय सहन करू नका… आवाज उठा, कायदा तुमच्या पाठीशी आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *