साखर धमाका – रेशनचा गोड घोटाळा? कुडगावात सरकारी साखरेच्या पिशव्यांचा ढीग प्रशासन हादरलं

गरीबांच्या हक्काची साखर कुठे गेली? आदिवासी वाडीत कचऱ्यात आढळल्या सरकारी पिशव्या; तहसीलदारांकडून उद्या चौकशी

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | राजेश बाष्टे – अलिबाग | दि. ०3 जून २०२६

श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव गावात रेशन व्यवस्थेतील कथित गैरप्रकाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदिवासी वाडी परिसरातील कचरा टाकण्याच्या जागेत मोठ्या प्रमाणात सरकारी रेशन साखरेच्या रिकाम्या पिशव्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. अंत्योदय व बीपीएल लाभार्थ्यांसाठी शासनाकडून वितरित होणाऱ्या साखरेच्या पिशव्या एकाच ठिकाणी व मोठ्या प्रमाणात आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख महेंद्र म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. “इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारी साखरेच्या पिशव्या एकाच ठिकाणी कशा आल्या? गरीबांच्या हक्काच्या धान्य व साखरेचा गैरवापर तर होत नाही ना?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रकाराची गंभीर दखल घेत श्रीवर्धन तहसीलदार व पुरवठा विभागाचे अधिकारी उद्या (४ जून) प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. चौकशीनंतरच नेमका प्रकार स्पष्ट होणार असला तरी या घटनेमुळे रेशन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गरीबांच्या तोंडची साखर नेमकी कुठे गेली? कुडगावातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या पिशव्यांचे गूढ उलगडणार का? याकडे आता संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याचे लक्ष लागले आहे.

छावा सवाल:रेशनची साखर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली की काळ्या बाजारात?

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *