रेवदंडा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अवघ्या 36 तासांत मोटारसायकल चोरीचा छडा; ओडिशातील सराईत चोराला पळस्पे येथे जेरबंद
छावा डिजिटल न्यूज | सचिन मयेकर | रेवदंडा – २० जुलै
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खानाव (ता. अलिबाग) येथे घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा अवघ्या 36 तासांत छडा लावत रेवदंडा पोलिसांनी उत्कृष्ट तपासकौशल्याचे दर्शन घडविले आहे. या कारवाईत चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून ओडिशा राज्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
खानाव येथील जितेश भास्कर पाटील (वय 33) यांनी 16 जुलै 2026 रोजी रात्री 11 वाजता त्यांची TVS Ntorq 125 (क्र. MH-06-CS-8745) ही मोटारसायकल घराच्या अंगणात उभी करून ठेवली होती. मात्र 17 जुलै रोजी पहाटे सुमारे 1.28 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 101/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि गडदे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अंगज यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली.
तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आरोपी चोरीची मोटारसायकल घेऊन पेण–पनवेल मार्गे जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षामार्फत तात्काळ वाहतूक शाखांना बिनतारी संदेश देण्यात आला. महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र पळस्पे यांच्या मदतीने नाकाबंदी करण्यात आली.
या संयुक्त कारवाईत पोलीस हवालदार मनिष ठाकूर, पोलीस हवालदार तुषार पारवे, पोलीस नाईक केदारनाथ साखरकर आणि पोलीस शिपाई समीर धुरी यांनी आरोपीला पळस्पे परिसरातून चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शंकर मंगल गिलवा (वय 33, रा. चम्पागड, ता. रोउरकेला, जि. सुंदरगड, राज्य ओडिशा) असे असून त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनिष ठाकूर करीत आहेत.
वेगवान तपास, अचूक तांत्रिक विश्लेषण आणि प्रभावी समन्वयाच्या जोरावर अवघ्या 36 तासांत गुन्ह्याचा छडा लावल्याने रेवदंडा पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
![]()

