रविवार विशेष – इतिहासावर ११४ कोटींची कमाई… पण इतिहास घडवणाऱ्यांच्या घरात आज भाकरीचा संघर्ष

११४ कोटींचा ‘राजा शिवाजी’… पण शिवरायांचे प्राण वाचवणाऱ्या जिवा महालेंच्या वंशजांच्या घरात आज उपासमार 

छावा डिजिटल न्यूज पोर्टल दि.२४ मे २०२६

 होता जिवा म्हणून वाचला शिवा…ही घोषणा आजही महाराष्ट्र अभिमानाने देतो…पण ज्या घराण्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचले, त्याच वीर जिवा महालेंच्या वंशजांवर आज जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे…सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कोंढवली या दुर्गम गावात वीर जिवा महालेंचे १४ वे वंशज आजही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्याचा दावा विविध ग्राऊंड रिपोर्टमधून समोर आला आहे…एकीकडे ‘राजा शिवाजी’ चित्रपट ११४ कोटींची कमाई करत असताना, दुसरीकडे इतिहास घडवणाऱ्या घराण्याच्या चुलीसाठी आईला मजुरी आणि मुलाला सलूनमध्ये केस कापण्याचं काम करावं लागत असल्याचं वास्तव समोर आलं आहे…छत्रपती शिवाजी महाराजांचा “अंगरक्षक” ही केवळ पदवी नव्हती…तर ती स्वराज्याच्या विश्वासाची आणि निष्ठेची सर्वात मोठी ओळख होती…ज्या जिवा महालेंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले, त्यांच्या वंशजांची आज अशी अवस्था असणं ही महाराष्ट्रासाठी वेदनादायक बाब आहे…आजही महाराष्ट्रात शिवरायांच्या नावाने मोठमोठे कार्यक्रम होतात…इतिहासावर कोट्यवधी रुपयांचे सिनेमे बनतात…पण प्रत्यक्ष इतिहास घडवणाऱ्या या घराण्याची शासनाने अद्याप गंभीर दखल घेतलेली दिसत नाही…

छावा’ची शासनाकडे एकच मागणी

    वीर जिवा महालेंच्या वारसांचा योग्य सन्मान व्हावा…त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार, वैद्यकीय मदत आणि सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक सुविधा द्याव्यात…कारण हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नाही…तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वराज्याच्या इतिहासाचा मान राखण्याचा विषय आहे…

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात महाबळेश्वरच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं एक छोटंसं दुर्गम गाव  कोंढवली.हेच ते गाव, जिथे “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही इतिहासात अजरामर झालेली घोषणा प्रत्यक्ष जन्माला आली.याच मातीत वीर जिवा महालेंचा पराक्रम घडला… आणि आजही त्यांचे १४ वे वंशज त्याच गावात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत.

      सचिन मयेकर     

दुर्दैव इतकंच की, ज्या कोंढवली गावाच्या नावाने महाराष्ट्राने अभिमान बाळगायला हवा होता, त्या गावाकडे आज व्यवस्था आणि समाज दोघांचंही दुर्लक्ष झालेलं दिसतं…एका बाजूला थिएटरमध्ये शिवरायांच्या इतिहासावर कोट्यवधींचा गल्ला जमतोय…तर दुसऱ्या बाजूला कोंढवलीच्या त्या छोट्याशा घरात इतिहास घडवणाऱ्या घराण्याची चूल पेटवण्यासाठी आईला शेतमजुरी आणि मुलाला सलूनमध्ये केस कापण्याचं काम करावं लागतंय.

होता जिवा म्हणून वाचला शिवा…

महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेली ही ओळ…पण आज त्याच जिवा महालेंच्या १४ व्या पिढीच्या नशिबी आली आहे गरिबी, वेदना आणि अक्षरशः वनवास.एकीकडे ‘राजा शिवाजी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ११४ कोटींची विक्रमी घोडदौड करत आहे… थिएटरमध्ये वीर जिवा महालेंच्या पराक्रमावर टाळ्या, शिट्ट्या आणि घोषणांचा पाऊस पडतोय…पण दुसरीकडे प्रत्यक्ष जिवा महालेंच्या वंशजांच्या घरात आज औषधांसाठीही पैसे नाहीत… सातारा जिल्ह्यातील दुर्गम कोंढवली गाव…इथे राहतात वीर जिवा महालेंचे १४ वे वंशज प्रकाश सपकाळ (महाले)…गेल्या ११ वर्षांपासून अर्धांगवायूमुळे ते खाटेवर खिळून आहेत…घरात ना स्थिर उत्पन्न… ना सरकारी मदतीचा आधार… ना कोणती प्रसिद्धी.पत्नी जयश्री सपकाळ दिवसभर दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करतात…तर तरुण मुलगा प्रतीक सपकाळ याने घरची परिस्थिती पाहून स्वतःचे शिक्षण दहावीतच अर्धवट सोडले.कारण एकच “वडिलांच्या महागड्या औषधांचा खर्च करायचा की शिक्षण घ्यायचं?”आज प्रतीक एका छोट्याशा सलूनमध्ये लोकांचे केस कापतो…त्या तुटपुंज्या पैशांवर घराची चूल पेटते…वडिलांची औषधं घेतली जातात…आणि इतिहास घडवणाऱ्या घराण्याचा संसार कसाबसा पुढे ढकलला जातो… ‘बाईमाणूस’च्या टीमने जेव्हा प्रत्यक्ष कोंढवली गाव गाठलं, तेव्हा सर्वात मोठा धक्का बसला तो वेगळाच…रस्त्यात अनेकांना विचारलं — “वीर जिवा महालेंचे गाव कुठे आहे?”लोकांनी गावाचा रस्ता दाखवला… पण अनेकांना हेच माहिती नव्हतं की जिवा महालेंचे वंशज आजही तिथेच राहतात.हीच खरी शोकांतिका आहे.ज्या शूरवीराच्या नावाने महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुगते…ज्यांच्या एका वारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचले…त्यांच्या घरात आज दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष सुरू आहे.एका बाजूला १०० कोटींचे सिनेमे…भव्य सेट मोठमोठ्या घोषणा…तर दुसऱ्या बाजूला इतिहास घडवणाऱ्या घराण्याच्या डोळ्यात अश्रू.“होता जिवा म्हणून वाचला शिवा…”ही फक्त घोषणा नाही…ती महाराष्ट्राच्या मातीची अस्मिता आहे…पण आज प्रश्न एकच आहे.शिवरायांना वाचवणाऱ्या त्या जिवाच्या घराला आता महाराष्ट्र वाचवणार का…?

प्रतापगडाच्या पायथ्याशी तो क्षण अंगावर शहारे आणणारा होता…अफजलखानाने कपटाने मिठी मारताच शिवरायांवर वार केला…क्षणभर संपूर्ण वातावरण हादरलं…आणि तेवढ्यात खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा तलवार घेऊन शिवरायांच्या दिशेने वेगाने धावला. समोर स्वराज्याचे छत्रपती संकटात होते…एका क्षणाचा उशीर झाला असता तर कदाचित इतिहासच बदलला असता…पण त्याच वेळी वीजेच्या वेगाने पुढे सरसावला तो वीर मावळा  जिवा महाला.डोळ्यांत ज्वाला…हातात तलवार…आणि छातीत स्वराज्यासाठी मरायची तयारी.जिवा महालेंनी एका घणाघाती वारात सय्यद बंडाचा हात अक्षरशः धडावेगळा केला.रक्ताच्या थारोळ्यात शत्रू कोसळला…आणि त्या एका क्षणाने छत्रपती शिवाजी महाराजांचे  प्राण वाचले…त्याच क्षणी इतिहासाने अजरामर केलेली ती गर्जना सह्याद्रीत घुमली 

🚩 “होता जिवा म्हणून वाचला शिवा.” 🚩

आजही तो प्रसंग आठवला की प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुगते…कारण जिवा महालेंनी फक्त महाराजांना वाचवलं नाही…तर हिंदवी स्वराज्याचा इतिहास वाचवला…

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *