रेवदंडा बाजारपेठेत जीवघेणा खड्डा मोठ्या अपघाताची भीती
सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०६ जून २0२६
रेवदंडा बाजारपेठेतील रेवदंडा अर्बन बँकेसमोर रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या, रुंद आणि खोल खड्ड्यामुळे पादचारी, दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहनचालकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सध्या मुसळधार पावसामुळे हा खड्डा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अनेक दुचाकीस्वारांचा तोल जात असून सुदैवाने आतापर्यंत मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असतानाही या धोकादायक खड्ड्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून अपघात टाळावेत, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
![]()

