काशीद बीचजवळ भरधाव कारमधून जीवघेणी स्टंटबाजी बुरखाधारी मुलींना कारच्या बाहेर लटकवत थरार व्हिडिओ व्हायरल

छावा डिजिटल न्यूज पोर्टल काशीद, सचिन मयेकर दि.२४ मे २०२६

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या काशीद बीच परिसरातील रस्त्यावर भरधाव वेगात सुरू असलेल्या आलिशान कारमधून चार बुरखाधारी मुलींना कारच्या बाहेर लटकवत जीवघेणी स्टंटबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे

एमजी ग्लॉस्टर कार क्रमांक एमएच ०४ एमडी ९९४४ या आलिशान वाहनातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे व्हिडिओमध्ये संबंधित कार भरधाव वेगाने धावताना दिसत असून मुली कारच्या खिडकी आणि दरवाज्याबाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसत आहेत हा प्रकार पाहून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे

एका क्षणासाठी जरी तोल गेला असता तर मोठी दुर्घटना घडली असती अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणे कितपत योग्य असा सवाल उपस्थित केला जात आहे

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रिल्स आणि स्टंटच्या नादात तरुणाई कोणत्या थराला जात आहे याचे हे गंभीर उदाहरण मानले जात आहे दरम्यान या प्रकरणात संबंधित कार नेमकी कोण चालवत होते कारमध्ये आणखी किती जण होते आणि हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून सुरू होता याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे

हल्ली  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी तरुणांमध्ये धोकादायक स्टंट करण्याची स्पर्धाच लागल्याचे चित्र आहे काही जण पैशाचे आमिष दाखवून प्रसिद्धीचे स्वप्न दाखवतात आणि त्यातून अनेक तरुण स्वतःचाच जीव धोक्यात घालत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे जसे जुगार मटका किंवा लॉटरीमध्ये लोकांना मोठ्या कमाईचे आमिष दाखवले जाते त्याचप्रमाणे सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि पैशाच्या हव्यासातून असे प्रकार वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे

कंपन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना फक्त व्ह्यूज आणि पैशाशी देणेघेणे असून तरुणांच्या जीवाचे काय असा सवालही आता उपस्थित केला जात आहे लोकांना भडक कंटेंटकडे आकर्षित करून स्वतः पैसे कमावण्याचा हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे

नागरिकांकडून संबंधित वाहन चालक तसेच वाहन मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून पोलिसांनी एमएच ०४ एमडी ९९४४ या वाहनाचा मालक कोण आहे याचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *