शिवसेनेचे राहुल पांडे आक्रमक बेकायदेशीर वाहन जप्तीप्रकरणी संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – नागपूर– सचिन मयेकर दि. २४ मे २०२६
एका गरीब शेतकऱ्याचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याच्या प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले असून या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. संबंधित कारवाई अत्यंत निंदनीय असल्याची भावना व्यक्त होत असून “RBI च्या नियमांना आणि कायदेशीर प्रक्रियेला कचऱ्याच्या टोपलीत टाकून सामान्य माणसाला वेठीस धरले जात आहे,” असा आरोप करण्यात येत आहे. नागपूरमधल्या या प्रकरणात शिवसेनेचे राहुल पांडे यांनी थेट संबंधित बँक अधिकाऱ्यांना फोन लावत आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. संभाषणादरम्यान इंग्लिशमध्ये नोटीस पाठवण्याच्या मुद्द्यावरून राहुल पांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे सांगितले जात आहे. “तू आधी फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिशन घे… मराठीचा अपमान करतो काय रे?” असा सवाल करत सामान्य माणसांना इंग्लिश नोटीस पाठवून घाबरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्याकडून उद्धट उत्तरे देण्यात आल्याची चर्चा असून त्यावर राहुल पांडे यांनी, “तुला कन्नडमध्ये नोटीस पाठवली तर समजेल का?” असा प्रतिप्रश्न करत “RBI चा कायदा मोडून काम करता काय रे?” असा थेट सवाल केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिसांसमोरच संबंधित बँकेने फोनवर “लोन खाते NPA झालेले नाही” असे कबूल केल्याचा दावा करण्यात आला. तरीदेखील ट्रॅक्टर उचलण्यात आल्याचा आरोप करत संबंधित पाटील व त्याच्या सहकाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या दहा दिवसांत जर ट्रॅक्टर परत देऊन शेतकऱ्याला न्याय दिला नाही, तर वेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.सध्या या संपूर्ण प्रकरणामुळे नागपूरमध्ये वातावरण तापले असून व्हायरल व्हिडिओंमुळे बँकांच्या वसुली पद्धतीवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

![]()

