मेडिकल बंदचा फटका सर्वसामान्यांना रोजंदारीवर जगणाऱ्या गरीब रुग्णांची मोठी गैरसोय
छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल, रेवदंडा –सचिन मयेकर – दि. २१ /०५/२६
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात रायगड जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी एकदिवसीय बंद पुकारत जोरदार एल्गार केला. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे दोन हजार मेडिकल दुकानदार सहभागी झाल्याने अनेक ठिकाणी मेडिकल दुकाने दिवसभर बंद राहिली.
या अचानक बंदचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांना बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. दवाखान्यातून औषधे घेण्यासाठी बाहेर पडलेल्या अनेकांना मेडिकल बंद असल्याने परत फिरावे लागले, तर काहींना दुसऱ्या शहरांचा मार्ग धरावा लागला. रेवदंडा, अलिबागसह अनेक भागांत नागरिकांची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले.
औषध विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायातील नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री, अँटीबायोटिक्सचा वाढता गैरवापर, तसेच बनावट औषधांचा धोका यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा संघटनांनी दिला आहे.
याशिवाय मोठ्या ई-फार्मसी कंपन्या मोठ्या सवलती देऊन स्थानिक मेडिकल व्यवसाय संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला. “रुग्ण आणि फार्मासिस्ट यांच्यातील प्रत्यक्ष संवाद कमी होत असून औषधांविषयी योग्य मार्गदर्शन मिळत नाही,” अशी भूमिका औषध विक्रेत्यांनी मांडली.
दरम्यान, रुग्णांची अडचण लक्षात घेऊन काही अत्यावश्यक सेवा आणि हॉस्पिटलशी संलग्न मेडिकल सुरू ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही औषध विक्रेता संघटनांनी दिला आहे.
औषध हे आजच्या काळात अनेक रुग्णांसाठी अक्षरशः “संजीवनी” बनले आहे. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, दमा अशा गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या हजारो रुग्णांचे जीवन रोजच्या औषधांवर अवलंबून आहे. मात्र मेडिकल बंदमुळे अनेक सामान्य नागरिकांकडे आवश्यक औषधे उपलब्ध नव्हती. काहींना औषधांशिवाय दिवस काढावा लागला, तर काही ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर रुग्णांची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली.
आज औषधांच्या किंमती आधीच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना श्रीमंत लोक महिनाभराची औषधे एकाच वेळी साठवून ठेवू शकतात. पण रोज मजुरी करून पोट भरणारा, हातावर कमावून पानावर खाणारा गरीब माणूस काय करणार? अनेक कुटुंबे अशी आहेत की ज्या दिवशी पैसे मिळतात, त्याच दिवशी औषधे विकत घेतली जातात. अशा परिस्थितीत अचानक मेडिकल बंद झाल्याने गरीब आणि गरजू रुग्णांचे अक्षरशः हाल झाले.
“छावा” चा सवाल स्पष्ट आहे जर एखाद्या रुग्णाला वेळेत औषध मिळाले नाही आणि त्याच्या जीविताला काही धोका निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? आंदोलन, मागण्या आणि व्यवसाय यापलीकडे सामान्य रुग्णांचा जीव सर्वात महत्त्वाचा नाही का? असा संतप्त प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित होत आहे.
![]()

