रायगड हादरला १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गर्भवती लैंगिक अत्याचार प्रकरणी १४ वर्षीय विधीसंघर्षित बालक ताब्यात
छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल, रेवदंडा –सचिन मयेकर – दि. २०/०५/२६
रायगड जिल्हा पुन्हा एकदा एका संतापजनक घटनेने हादरला आहे. मुरुड तालुक्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पीडित मुलीमध्ये अचानक शारीरिक बदल जाणवू लागल्यानंतर कुटुंबीयांना संशय आला. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे मुरुड तालुक्यात संतापाची लाट उसळली असून पालकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेवदंडा पोलिसांनी तत्काळ कारवाईचे चक्र फिरवले. अतिरिक्त तपास पथक आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून 14 वर्षीय विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. रेवदंडा पोलीस ठाण्याने या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेल्या विधीसंघर्षित बालकाची पुढील कायदेशीर कारवाईसाठी कर्जत येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक कसून तपास करत असून, या प्रकरणातील इतर बाजूही तपासल्या जात आहेत. या घटनेने पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, समाजमन सुन्न झाले आहे.
![]()

