रायगडावर प्री-वेडिंग शूट; सुरक्षा यंत्रणा कुठे होती? भरत गोगावले संतप्त गडावर वात्रटगिरी सहन केली जाणार नाही शिवप्रेमींचा भडका
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,रायगड १४ एप्रिल २०२६
किल्ले रायगड येथे प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत अशा प्रकारचे चित्रीकरण कसे झाले, यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
रायगडासारख्या ऐतिहासिक आणि पवित्र स्थळी अशा प्रकारचे शूट कसे झाले? तेथे असलेली सुरक्षा यंत्रणा नेमकी कुठे होती? संबंधित अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली का? असे सवाल आता शिवप्रेमींकडून उपस्थित केले जात आहेत.
या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री भरत गोगावले यांनी कडक शब्दांत इशारा दिला.
रायगडावर सुरक्षा व्यवस्था असताना असे प्रकार कसे घडतात? संबंधित सुरक्षा यंत्रणेवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल. तसेच प्री-वेडिंग शूट करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल. CCTV फुटेज तपासून दोषींना सोडले जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या पवित्र गडावर प्री-वेडिंग किंवा फ्री-वेडिंग शूटसारखे प्रकार अजिबात चालणार नाहीत,असे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वराज्य उभारले. ज्या किल्ल्यांवर त्यांनी संघर्ष केला, जिथे त्यांच्या पवित्र चरणांचा स्पर्श झाला, त्या ठिकाणांचा आज काही जण पैसा कमवण्यासाठी वापर करत आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
जिथे स्वराज्याच्या रक्ताने भूमी पवित्र झाली, जिथे महाराजांचे पवित्र चरण पडले, त्या गडांवर आज तरुण तरुणीचे वात्रटपणाचे खेळ सुरू असतील, तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. असे परखड आणि स्पष्ट मत शिवप्रेमीकडून ‘छावा’ प्रतिनिधिशी व्यक्त करण्यात आले आहे.
![]()

