नकाशा पुसला तरी स्वराज्य पुसणार नाही शिवरायांचा इतिहास हटवण्याचा प्रयत्न उघड

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल रायगड २५ एप्रिल २०२६

महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित मोठा वाद समोर आला असून, NCERT ने इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हा केवळ अभ्यासक्रमातील बदल नसून इतिहासाशी छेडछाड असल्याचा आरोप विविध स्तरांतून केला जात आहे.

या निर्णयावर राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी तीव्र प्रतिक्रिया देत याला “धोक्याची घंटा” म्हटलं आहे.

त्या म्हणाल्या, “आज नकाशा काढला जातोय… उद्या छत्रपतींवरच पडदा पडेल का? हे थांबायला हवं!”

त्यांनी पुढे स्पष्ट शब्दांत सांगितलं

“पृथ्वीवर सूर्य, चंद्र, तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत राहतील!”

साताऱ्यात आंदोलन, अल्टिमेटम जाहीर
या निर्णयाच्या निषेधार्थ साताऱ्यात वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. “नकाशा हटवला तरी सत्य हटणार नाही”, “इतिहास पुसणार नाही, महाराष्ट्र झुकणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्र सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, नकाशा पुन्हा समाविष्ट न केल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे या प्रकरणात संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सविस्तर पत्र पाठवले आहे. त्यांनी पत्रात नमूद केलं आहे की मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणे म्हणजे केवळ शैक्षणिक बदल नाही, तर इतिहास आणि मराठ्यांच्या योगदानाचा अपमान आहे. भावी पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचणं आवश्यक असल्याने नकाशा तात्काळ पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. या संपूर्ण प्रकरणामुळे एक गंभीर प्रश्न समोर आला आहे. आज नकाशा वगळला… उद्या धडे कमी होतील आणि परवा इतिहासच बदलला जाईल का? इतिहास हा केवळ पुस्तकातला धडा नाही तो एका समाजाची ओळख, स्वाभिमान आणि संस्कृती आहे. इतिहासाच्या पुस्तकातून नकाशा काढला जाऊ शकतो… पण लोकांच्या मनातून स्वराज्य काढता येणार नाही.  छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहास नाहीत ते प्रत्येकाच्या रक्तात वाहणारी प्रेरणा आहेत. नकाशा हटवला तरी सत्य हटणार नाही… स्वराज्य कधीच मिटणार नाही.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *