एन्काउंटरचा बदला! दया नायक यांच्या खबऱ्याची निर्घृण हत्या
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल मुंबई २५ एप्रिल २०२६
मुंबई : शहराच्या अंडरवर्ल्ड इतिहासाला पुन्हा एकदा हादरा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 27 वर्षांपूर्वी झालेल्या एका कुख्यात पोलीस एन्काउंटरचा सूड आता रक्तरंजित हत्येद्वारे उगवण्यात आल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे.
नागपाडा परिसरात 78 वर्षीय इक्बाल इब्राहिम सेलिया यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी 20 पेक्षा अधिक वार करण्यात आले होते. ही हत्या केवळ वैयक्तिक वैरातून नव्हे, तर जुन्या गुन्हेगारी इतिहासाशी जोडलेल्या सूडातून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, 1999 साली पोलीस चकमकीत ठार झालेल्या कुख्यात गुंड सादिक कालियाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा पुतण्या सादिक जवार गेली अनेक वर्षे संधीच्या शोधात होता. अखेर 20 एप्रिल रोजी त्याने आपल्या साथीदारासह सेलिया यांना लक्ष्य केले.
प्राथमिक तपासात समोर आले आहे की, इक्बाल सेलिया यांनीच त्या काळी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या पथकाला सादिक कालियाबाबत माहिती पुरवली होती. याच कारणावरून सादिक जवारने हा सूड उगवला असल्याची कबुली चौकशीत दिली आहे.
हत्येच्या दिवशी सेलिया घरी एकटे असताना आरोपींनी घरात घुसून त्यांच्यावर हल्ला चढवला. निर्दयीपणे वार करत त्यांचा जीव घेतल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. सीसीटीव्हीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी अँटॉप हिल, विद्याविहार, कल्याण असा मार्ग बदलत पळ काढला आणि अखेर नागपूरमध्ये आश्रय घेतला.
दरम्यान, नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करताच गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. अवघ्या चार दिवसांत नागपूरमध्ये सापळा रचून सादिक जवार (वय 29) आणि त्याचा साथीदार नौशाद मिथानी (वय 22) यांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी या कारवाईची पुष्टी केली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे 1990 च्या दशकातील मुंबईतील अंडरवर्ल्डची भीती पुन्हा एकदा समोर आली आहे. सूड, खबरीगिरी आणि एन्काउंटरच्या सावलीत वाढलेल्या गुन्हेगारीचे परिणाम कित्येक वर्षांनंतरही किती भयानक असू शकतात, याची ही घटना जिवंत उदाहरण ठरली आहे.
![]()

