चौल भगवती येथे मटका जुगारावर रेवदंडा पोलिसांचा छापा; ₹29,700 चा मुद्देमाल जप्त
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल सचिन मयेकर
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौल भगवती (ता. अलिबाग) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर रेवदंडा पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ₹29,700 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम, 1887 चे कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 8.40 वाजण्याच्या सुमारास चौल भगवती येथे यांतील आरोपी (वय 47, रा. चौल भगवती, ता. अलिबाग) हा लोकांकडून बेकायदेशीरपणे पैसे स्वीकारून मोबाईलवरील व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आकडेमोड नोंदवत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मटका जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून संबंधितावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल केदारनाथ नामदेव सांगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. क्र. 105/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची नोंद 23 जुलै 2026 रोजी रात्री 11.29 वाजता करण्यात आली. कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन (एअरटेल सिमसह) तसेच ₹4,700 रोख रक्कम असा एकूण ₹29,700 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या कारवाईला सपोनि सुजीत गडदे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोना/2227 पाटील हे करीत आहेत. रेवदंडा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर मटका जुगार व्यवसायाला चाप बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
![]()

